लग्नाच्या आमिषाने एकीशी शरीरसंबंध अन्‌ लग्न दुसरीशीच करायला निघाला...

पोलिसांनी मंडपात जाऊन वरात काढली पोलीस ठाण्यात!
 
अमरावती : रेल्वेत नोकरी करणाऱ्या तरुणाने एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. मी तुझ्याशीच लग्न करणार, तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचा विचारही माझ्या मनात येणार नाही... असे म्हणत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पण गरज भागल्यानंतर त्‍याने दुसऱ्याच तरुणीशी लग्न ठरवले. ही कुणकुण तरुणीला लागली. तिने पोलिसांत तक्रार केली आणि पोलिसांनी थेट लग्नमंडपात जाऊन बोहल्यावर चढण्याच्या तयारीत असलेल्या नवरदेवाला उचलून पोलीस ठाण्यात आणले. कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. अजय उर्फ विक्की फ्रान्सिन्स असे आरोपी नवरदेवाचे नाव आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या पीडित तरुणी एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. आरोपी अजय हा कल्याणच्या रेल्वे यार्डात नोकरीला आहे. अजयचे आणि तरुणीचे प्रेमसंबध होते. दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. मी तुझ्याशी लग्न करणारच, अशी शपथ घेऊन अजय तिच्या शरीराचा उपभोग  घेत होता. यातून तरुणी गर्भवती राहिली तेव्हा अजयने तिला गर्भपात करायला लावला.

काही दिवसांनी अजय सुटीनिमित्त त्याच्या गावी अमरावती जिल्ह्यातील बडनेरा गावी गेला. तिथे त्याचे दुसऱ्याच मुलीशी लग्न ठरले. २९ डिसेंबर रोजी लग्नसोहळा होणार होता. याची कुणकुण त्याच्या आधीच्या प्रेयसीला लागली. तिने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन अजयविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. २९ डिसेंबरच्या पहाटेच पोलीस बडनेरा येथे धडकले आणि लग्नाच्या बोहल्यावर चढण्याच्या तयारीत असलेल्या नवरदेवाला पोलिसांनी अटक केली.