भावी पतीनेच व्हिडिओ कॉल करून कपडे काढायला सांगितले! म्‍हणाला, हे सिक्रेट राहील आपल्यात!!, लग्न तुटल्यावर हेच सिक्रेट मग सगळीकडे पाठवले

 
अमरावती : ज्या तरुणासोबत लग्न जुळले त्याने लग्नाआधीच तिला व्हिडिओ कॉल करत कपडे काढायला सांगितले होते. आपल्यातील गोष्टी सिक्रेट राहतील असे म्‍हणून तिचा विश्वास संपादन करून चार वेळेस न्यूड व्हिडिओ कॉलिंग त्यांच्यात झाले. मात्र काही कारणास्तव वधूच्या कुटुंबियांनी लग्न तोडल्यानंतर संतापलेल्या तरुणाने त्या व्हिडिओ कॉलचे स्क्रिनशॉट व्हायरल केले. पीडित तरुणीने पोलिसांत धाव घेतल्यानंतर पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, अमरावती शहरात राहणाऱ्या एका तरुणीचे चांदूर बाजार येथील एका तरुणाशी मागील वर्षी लग्न ठरले होते. त्यानंतर दोघांमध्ये फोनद्वारे संवाद सुरू होता. फोनवरचा संवाद व्हिडिओ कॉलवर आला. लग्न करणारच आहोत... तू मला नग्न होऊन व्हिडिओ कॉल कर... असे तरुण तरुणीला म्हणत होता. आपल्यातल्या गोष्टी कुणाला सांगणार नाही, असे सांगून त्याने तिचा विश्वासही संपादन केला.

तरुणीने कपडे काढून त्याला व्हिडिओ कॉल केला. तरुणाने या कॉलचे स्क्रीनशॉट घेतले होते. नंतर काही कारणास्तव तरुणीच्या परिवाराने हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तरुणाने  तरुणीचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो तरुणीच्या बहिणीला व काकूला व्हाॅट्स अॅपवर पाठवले. पीडित तरुणीच्या भावाने फोटो पाठवणाऱ्या मोबाइल नंबरचा शोध घेतला असता नंबर एका महिलेचा असल्याचे समोर आले.

त्यानंतर २१ डिसेंबरला तरुणीच्या बहिणीच्या मोबाइलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोटो पटविणाऱ्या महिलेचा भाऊ बोलत आहे. तुझ्या बहिणीचे माझ्याकडे खूप अश्लील फोटो आहेत. ५ लाख रुपये दिले नाही तर फोटो व्हायरल करून तुझ्या बहिणीची बदनामी करेन, अशी धमकी तरुणाने दिली, असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.