११ वीतच वर्गमित्राने घातली प्रेमाची मोहिनी!; नंतर दोघांनी उचलले हे धक्कादायक पाऊल!!

 
जळगाव : ती आणि तो अकराव्या वर्गात. मात्र शिक्षणाकडे लक्ष देण्याऐवजी त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तीही फसली आणि १३ जानेवारीच्या रात्री त्याने तिला पळवून नेले. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

दिव्या आणि शफाकत (नावे काल्पनिक) दोघेही जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरी तालुक्यातील माहेजी गावचे आहेत. दोघेही एकाच वर्गात शिकतात. दिव्याचे वडील मोलमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. १३ जानेवारीच्या रात्री दिव्या आई- वडिलांसह घरात पलंगावर झोपली होती. १४ जानेवारीच्या पहाटे ४ ला दिव्याची आई झोपेतून उठल्यावर दिव्या घरात दिसली नाही. आई- वडिलांनी सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही.

घरातल्या कपाटातील दिव्याचे आधार कार्ड व इतर शाळेची कागदपत्रेसुद्धा गायब होते. आई- वडिलांनी दिव्याच्या लग्नासाठी मोलमजुरी करून जमवलेले ५० हजार रुपये व नऊ ग्रॅम सोने घेऊन दिव्या निघून गेल्याचे आई- वडिलांच्या लक्षात आले. दिव्याच्या वडिलांना गावातीलच शफाकतवर संशय असल्याने त्यांनी त्याच्या घरी जाऊन चौकशी केली असता शफाकतसुद्धा घरी दिसून आला नाही. त्यामुळे शफाकतने मुलीला फुस लावून पळवून नेल्याचे दिव्याच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.