भाडेकरू युवकाचा घर मालकिणीवर बलात्कार; मानलेला भाऊ म्हणून तिने दिला होता आसरा; चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा

 
पुणे ः मानलेला भाऊ म्हणून घर मालकीण महिलेने युवकाला स्वतःच्या घरात राहायला भाड्याने खोली दिली. मात्र त्या तरुणाची घर मालकीण महिलेवरच वाईट नजर पडली. त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या चिखली भागात २१ डिसेंबर रोजी ही घटना घडली. याप्रकरणी महिलेने १० जानेवारी रोजी पिंपरी चिंचवडच्या चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून रामहरी वगरे (३१, रा. असंगी, ता. जत, जि. सांगली) या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामहरी हा घरमालक महिलेच्या ओळखीचा होता. महिलेने त्याला भाऊ मानले होते. त्यामुळे त्याला घराच्या गच्ची खोली भाड्याने दिली होती. महिला कामानिमित्त गच्चीवर गेली तेव्हा रामहरीने महिलेशी गप्पा मारल्या व मोबाइलमध्ये फोटोसुद्धा काढले. त्यानंतर २१ डिसेंबरला महिला गच्चीवर गेली तेव्हा युवकाने महिलेला खोलीत ओढले. तुझे- माझे फोटो तुझ्या नवऱ्याला दाखवेल. नवरा काही बोलला तर त्याला मारून टाकीन. त्यामुळे आता मी सांगतो तसे कर, असे म्हणत लैंगिक अत्याचार केला. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.