घ्या आता! सरकारने योजना दिली चांगली, पण वेबसाईटच्या गोंधळाने पांगली ; जन्म दाखला मिळेना! वेबसाईटमध्ये तांत्रिक अडचण !

 
Hbvv
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात विविध योजनांच्या घोषणांचा पाऊस झाला. विविध योजनांसाठी अर्ज करण्यासाठी काल १ जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. ही अर्ज प्रक्रिया अत्यंत डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येते. विविध योजनेच्या लाभासाठी अर्ज करताना जन्म दाखल्याची आवश्यकता लागते. त्यामुळे नगरपालिका ठिकाणी जन्म दाखला काढण्यासाठी महिलांसह नागरिकांची देखील मोठी गर्दी जमली आहे. परंतु ऐन अर्ज प्रक्रियेच्या काळातच नगरपालिकेचे जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी असलेल्या वेबसाईट मध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने सर्वसामान्य जनतेसह अधिकाऱ्यांची देखील दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे. 
 राज्य सरकारच्या योजनाच नाही तर आता शाळा देखील सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसाठी जन्मदाखला लागतोय. यासाठी पालक वर्ग कामाला लागले आहे. नगरपरिषदे अंतर्गत रहिवास असलेल्या नागरिकांना जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. नगरपालिकेतून जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटद्वारे ऑनलाइन पद्धतीने पूर्वी अगदी दहा मिनिटातच जन्मदाखला मिळत असे. परंतु, काही दिवसांपूर्वीच वेबसाईट मध्ये तांत्रिक अडचण झाल्याने अर्धा ते दीड तास एक दाखला मिळवण्यासाठी लागत आहे. यामुळेच नागरिकांसह अधिकाऱ्यांची देखील दमछाक होताना दिसत आहे. तीन तीन घंटे उभे राहून देखील दाखला मिळत नसल्याने नागरिकांची दैना होत आहे.
भाऊ, दहा हप्ते झाले फेऱ्या मारून राहिलो पण अजून काही जन्म दाखला मिळाला नाही असे नागरिक म्हणतात. दरम्यान, या संबंधित नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते म्हणाले, पालिका प्रशासनाने वेबसाईट अपडेट केली. परंतु अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेतले नाही. त्याविषयी माहिती, अधिकारी कर्मचाऱ्यांपर्यंत योग्य पद्धतीने मिळाली नाही. पूर्वीच्या वेबसाईटने दहा मिनिटातच जन्म दाखला हातात येत असे.. पण आता एक ते दीड तासाचा वेळ लागत असल्याचे संबंधित विभागाचे अधिकारी किशोर गायकवाड यांनी सांगितले.