STATE NEWS बाईकच्या वेडापायी तरुणाने रचले भलतेच कांड! स्वतःच्या अपहरणाचा केला बनाव, वडिलांना मागितली ३० हजारांची खंडणी! २ तासांत सत्य बाहेर आले...! वाचा नेमके प्रकरण काय..
Dec 12, 2023, 08:46 IST
नालासोपारा( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): एका २० वर्षीय तरुणाने बाईकच्या वेडापायी स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचून ३० हजारांची खंडणी स्वतःच्याच वडिलांकडे मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अवघ्या २ तासांत डाव हाणून पाडून तरुणाला पकडून आई-वडिलांच्या ताब्यात दिले.
८ डिसेंबर रोजी नन्नेलाल रामचरण यादव यांनी मुलगा अंकीतकुमार यादव हा ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३०च्या सुमारास घरातून निघून गेला आहे अशी तक्रार वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्याकडे दिली. मुलगा अल्पवयीन असल्याने अपहरणाच्या प्रकरणाची दखल घेऊन पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे, वालीव पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जिलानी सय्यदच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, संदेश राणे, रंजित नलावडे, गुरुदास मोरे, मुकेश पवार, मनोज मोरे, रुस्तुम राठोड, सतीश गांगुर्डे, बाळु कुटे, विनायक राऊत, अभिजीत गढरी यांची ४ पथके तयार केली.
तपासादरम्यान मुलाचे वडील पोलीस ठाण्यात आले व त्यांच्या हरवलेल्या मुलाने मोबाईलवरून फोन करून त्याचे तीन अनोळखी व्यक्तींनी अपहरण केले असून, त्यांना ३०,००० रक्कम खंडणी न दिल्यास जिवे मारणार असल्याचे सांगितले. त्यासाठी त्याच्या मोबाईल व्हॉट्सअपवरून यूपीआय स्कॅनरचा फोटो पाठवून त्यावर खंडणीची रक्कम पाठवण्यास सांगितली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.
अधिकारी व अंमलदारांची वेगवेगळी ४ पथके तयार केली. मुलांच्या शोधासाठी वसई, विरार, नालासोपारा परिसरात पथक रवाना केले. तांत्रिक मदतीच्या आधारे मुलगा तो ७ ते ८ तारखेच्या दरम्यान गुजरात, डहाणू, भिवंडी भागात गेल्याचे निष्पन्न झाले. ज्या यूपीआय स्कॅनरचा फोटो पाठवला त्याचा शोध घेतल्यावर त्या दुकानदाराने अंकीत थोड्या वेळापूर्वी येऊन आपल्याकडे येऊन गेल्याचे सांगितले. नंतर तो पोलिसांना वसई फाटा परिसरामध्ये दिसला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता बाईक रिपेरिंगसाठी पैशांची आवश्यकता असल्याने त्यानेच अपहरणाचा बनाव करून खंडणी मागितल्याची माहिती दिली. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच अंकीतला आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.