STATE NEWS धक्कादायक! दोन अल्पवयीन मुलांनी केली आत्महत्या! एक दहावीत होता,दुसरा नववीत! एकाने बहिणीच्या मोबाईलवर मॅसेज पाठवून सांगितले कारण,

दुसऱ्याने चिठ्ठी लिहून ठेवली! आत्महत्येचे कारण सर्वांनाच विचार करायला लावणारे...
 
मुंबई ( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): मुंबईच्या नेरूळ भागात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दर्शील पाटील (१५) व पृथ्वी ढवळे (१४) अशी या मुलांची नावे असून यातील एका मुलाने मानसिक तणावाखाली येऊन, तर दुसऱ्या मुलाने अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांकडून या दोन्ही घटनांचा अधिक तपास करण्यात येत आहे.
करावे गावात राहणारा दर्शील पाटील हा नेरूळमधील शाळेमध्ये इयत्ता दहावीत शिकत होता. वर्षभरापूर्वीच दर्शीलच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर सर्वजण दर्शीलकडून चांगला अभ्यास करून शिक्षण घेण्याची तसेच आई व बहिणीचा सांभाळ करण्याची अपेक्षा करत होते. मात्र त्याला कुणीही समजून घेत नसल्यामुळे त्याचे अभ्यासातदेखील मन रमत नव्हते. त्यामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या दर्शीलने रविवारी मध्यरात्री आई व बहीण झोपलेले असताना "आपण कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नसल्यामुळे आत्महत्या करत आहे" असा मेसेज आपल्या बहिणीच्या मोबाईलवर पाठवून दिला. त्यानंतर त्याने करावे गावालगतच्या तलावात उडी टाकून आत्महत्या केली. 
  सोमवारी पहाटे दर्शील घरात नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्या आई व बहिणीने परिसरात त्याचा शोध सुरू केला. यावेळी करावे येथील तलावालगत त्याची चप्पल व स्कूटी आढळून आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने तलावात शोध घेतला असता त्यात त्याचा मृतदेह आढळून आला. एनआरआय पोलिसांनी या घटनेची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. 
दुसरी घटना
   नेरूळ सेक्टर-१६ मध्ये राहणाऱ्या पृथ्वी ढवळे या मुलाने रविवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. पृथ्वी इयत्ता नववी मध्ये शिकत होता. रविवारी सायंकाळी त्याचे आई-वडील व बहीण खरेदीसाठी बाजारात गेले होते. यावेळी घरामध्ये एकटाच असलेल्या पृथ्वीने बेडशीटच्या सहाय्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. रात्री पावणेदहाच्या सुमारास पृथ्वीचे आई-वडील घरी परतल्यांनतर त्यांना हा प्रकार निदर्शनास आला पृथ्वीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली असून त्यात त्याने अभ्यास जमत नसल्याचे म्हटले आहे. यावरून त्याने अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. नेरूळ पोलिसांनी या घटनेची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.