ST आंदोलन; भाजपा नेत्यांवर गृहमंत्र्यांचा गंभीर आरोप!

 
jayant patil
मुंबई  : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात भाजपाचे नेतेच पुढे जाऊन बसतात. दंगा करतात. अर्वाच्च भाषेत बोलतात. त्‍यामुळेच त्‍याला राजकीय पद्धतीने उत्तर दिले जात आहे. एसटी कर्मचारी आमचेच असून, राज्‍य सरकारने त्‍यांच्‍याकडे दुजाभावाने पाहिलेले नाही. त्‍यांचे प्रश्न सोडविण्याची आम्‍ही पूर्ण इच्छा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे. परिवहन मंत्री अनिल परब एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करत असून, त्‍यांचे प्रश्न लवकर सुटावेत हीच राज्‍य सरकारची भूमिका असल्याचेही ते म्‍हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटना सरकारविरोधी वातावरण निर्माण करण्यास उत्‍सुक नाहीत हे पाहून भाजपाचे नेते स्वतःच पुढे येऊन आंदोलन करत असल्याचा आरोप मंत्री पाटील यांनी केला आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे यासह अन्य मागण्यांसाठी सध्या राज्‍यभरातील एसटी कर्मचारी संपावर आहेत. २७ ऑक्टोबरला सुरू झालेले आंदोलन दुसऱ्याच दिवशी जाहीर वाढीव महागाई भत्ता मान्य करताच संयुक्त कृती समितीने मागे घेतले होते. त्‍यानंतर या कृती समितीवर आरोप करत एसटी कर्मचारी कोणत्याही संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र न येता २९ ऑक्टोबरपासून संपावर गेले आहेत. आज, १२ नोव्‍हेंबरला त्‍यांचाही संप कायम आहे. सध्या राज्यातील २५० आगारांतील बससेवा ठप्प असून, यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत, तर खासगी प्रवासी वाहतूकदारांची मात्र चांदी होत आहे.