...म्हणून मकर संक्रांतीला घालावेत काळे कपडे!
ज्योतिष शास्त्रानुसार मकरसंक्रांतीला सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. एका राशीतून दुसऱ्या राशीत होणाऱ्या संक्रमणाला संक्रांत असे म्हणतात. मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होते. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र ही मोठी असते आणि याच दिवसापासून कणा कणाने दिवस वाढायला सुरुवात होते. काळोख्या रात्रीला काळ्या रंगाचे कपडे नेसून आपण निरोप देतो, असं पूर्वीपासून सांगण्यात आले आहे. काळे कपडे घालण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, काळा रंग हा उष्णता शोषून घेतो.
जानेवारी महिन्यात थंडीचे प्रमाण अधिक असल्याने शरीर ऊबदार राहावे यासाठी देखील काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जातात. तीळ -गूळ खाल्ल्याने शरीरातील उष्णता टिकून राहते. म्हणून संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे परिधान करून तीळ गूळ वाटण्याची प्रथा आहे. मकर संक्रांतीला नवीन लग्न झालेल्या नवरीची पहिली संक्रांत, हलव्याचे दागिने, जावयाचा सण या गोष्टीसुद्धा तेवढ्याच उत्साहाने साजऱ्या होतात. मकरसंक्रांतीला नव्या नवरीकडून खास उखाणे ही म्हणून घेतले जातात. सणांच्या निमित्ताने एकमेकांच्या भेटी होतात. यंदा कोरोनाचा धोका असला तरी नियमांचे पालन करून सण नक्की साजरा करता येऊ शकतो. म्हणूनच तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला... सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप-खूप शुभेच्छा!