धक्कादायक...! मित्राला वाढदिवसानिमित्त पत्‍नी केली गिफ्ट!

पती व त्‍याच्या मित्राचा आळीपाळीने लैंगिक अत्‍याचार!!
 

मुंबई : मुंबईच्या अंधेरीत सामूहिक लैंगिक अत्‍याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाढदिवसानिमित्त मित्राला चक्क पत्‍नीच भेट देण्याचा विकृतपणा एका पतीने केला. मित्राच्या घरी पत्‍नीला नेऊन त्‍याने व त्‍याच्‍या मित्राने २५ वर्षीय तरुण विवाहितेवर आळीपाळीने लैंगिक अत्‍याचार केला. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह त्‍याच्‍या मित्राला अटक केली आहे.

मूळची बिहारची असलेली पीडिता अंधेरीतील सातबंगला भागात राहते. तिचा पती सिक्‍युरिटी गार्ड आहे, तर त्‍याचा मित्र एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये शेफ आहे. २६ नोव्हेंबरला सायंकाळी घरी आल्यानंतर पतीने तिला मित्राच्या वाढदिवसाला जायचे असल्याचे सांगून तयार व्हायला सांगितले. दोघे सायंकाळी सुरेशनगरात राहणाऱ्या त्‍याच्‍या मित्राकडे गेले. मात्र तिथे मित्र आणि पतीव्यतिरिक्‍त कुणीच नसल्याने तिने पतीला तिथून घरी चलण्यास सांगितले. मात्र त्‍याने दार लावून घेतले. त्‍यानंतर मित्राने व त्‍याने दारू पिली. दारूच्या नशेतच दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्‍याचार केला. याबद्दल कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी पतीने दिली. त्‍यामुळे ती प्रचंड घाबली. रात्री उशिरा पतीसह घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिने नातेवाइक महिलेला ही घटना सांगितली. नातेवाइक महिलेने तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. नातलग महिलेसह येऊन तिने आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी पती व त्‍याच्‍या मित्राविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. दोघांना काल अटक करण्यात आली असून, न्‍यायालयाने त्‍यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.