धक्कादायक! अवघ्या १३ वर्षीय पोरीचं लग्न लावलं!!

 
सोलापूर : केंद्र सरकारने मुलींच्या लग्नाचे वय २१ वर्षे करण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केला असला तरी इथे लोकांना १८ व्या वर्षांपर्यंत थांबायला होत नाही तिथे २१ पर्यंत कसे थांबतील हा प्रश्नच आहे. सोलापूर जिल्ह्यात चक्क तेरा वर्षांच्या बालिकेचे लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या वडिलांचा लग्नाला विरोध होता .मात्र मुलीच्या आईनेच हा विवाह लावून दिला. गावच्या पोलीस पाटलाने या प्रकरणी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून नवरदेव, नवरदेवाची आई व नवरीच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील भुताष्टे गावात २७ डिसेंबर रोजी हा विवाह झाला. मुलीचे वडील जनार्धन श्रीपती शिंदे (रा. हाडगा, ता. निलंगा, जि. लातूर) यांनी माढा पोलिसांना फोन करून माझ्या अल्पवयीन मुलीचा होत असल्याने विवाह थांबवा, अशी विनंती पोलिसांना केली होती. मात्र पोलीस व पोलीस पाटील लग्नमंडपात पोहोचेपर्यंत तो विवाह सोहळा पार पडला होता.

भुताष्टे येथील सज्जन गजेंद्र बरेड याच्यासोबत तेरा वर्षीय मुलीचा विवाह झाला होता. तिच्या गळ्यात मंगळसूत्र व पायात जोडवे होते. नवरदेव, नवरदेवाची आई आणि नवरीच्या आईला मुलीच्या वयाची माहिती असतानासुद्धा त्यांनी हे लग्न लावून दिले. याप्रकरणी भुताष्टे गावचे पोलीस पाटील सतिश उद्धव यादव यांनी दिलेल्या तक्रारीवरून नवरीची आई सविता जनार्धन शिंदे, नवरदेवाची आई विमल गजेंद्र बरड व नवरदेव सज्जन गजेंद्र बरड यांच्याविरुद्ध माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.