पती नसताना शिवसेनेचा पदाधिकारी घरी यायचा अन्‌ लैंगिक अत्याचार करायचा...

विवाहित तरुणी इतकी वर्षे शोषण सहन करत राहिली, अखेर...
 
अहमदनगर (नगर लाइव्ह वृत्तसेवा) ः अहमदनगर जिल्ह्यातील जेऊर येथील शिवसेनेचा पदाधिकारी गोविंद मोकाटे याच्यावर विवाहित तरुणीने वारंवार बलात्कार केल्याचा आरोप लावला आहे. दोन वर्षांपासून मोकाटे धमकावून तिचे शोषण करत असल्याचे तिने तक्रारीत म्‍हटले आहे. सुरुवातीला फेसबुकवर फ्रेंडरिक्वेस्ट, नंतर अश्लील मेसेज... तरीही प्रतिसाद मिळत नसल्याने त्‍याने तिच्या पतीशी ओळख वाढवली आणि घरी येऊ आला. एक दिवस पती घरी नसताना घरी येऊन धमकावत तिच्यावर बलात्‍कार केला. त्‍यानंतर त्‍याचे हे अत्याचाराचे सत्र सुरूच झाले, असे विवाहितेने म्हटले आहे. नगर शहरातील तोफखाना पोलिसांनी मोकाटेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मोकाटेची मुलगी उमेदवार होती. तिच्या प्रचारासाठी मोकाटेने मतदारांना वाटलेली दारू विषारी निघून ९ जणांचा बळी गेला होता. अनेकांना अंधत्व आले होते. दारू तयार करणाऱ्यासह मोकाटे व त्याच्या मुलीविरुद्धही या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. त्‍याच मोकाटेवर आता बलात्काराचे आरोप झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विवाहित तरुणीने तक्रार दिली, की  २०१८ पासून मोकाटे तिच्यावर प्रेमाचे जाळे फेकत होता. तिला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तिने तीन वेळा ती नाकारली. त्यानंतर मोकाटेने तिला मेसेज करून महत्त्वाचे काम असल्याचे सांगत रिक्वेस्ट ॲक्‍सेप्ट करण्याची विनंती केली. कोणी ओळखीचे असेल असे वाटून तिने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली.

त्यानंतर त्‍याने तिला अश्लील मेसेज पाठवायला सुरुवात केली. त्‍यामुळे तिने त्‍याला ब्लॉक केले. तिचा पती मसाज करून देतो, ही माहिती मिळाल्यानंतर मोकाटेने तिच्या पतीशी ओळख वाढवली. त्‍याला पाठ-कंबर दुखते असे सांगून मसाज करून द्यायला सांगितले. विवाहितेच्या घरी येऊन त्‍याने तिच्या पतीकडून मसाज करून घेतला. त्‍यानंतर एक दिवस पती घरी नसताना तो आला आणि धमकावून तिच्यावर बलात्कार केला. नंतर पती घरी नसताना वारंवार येऊ लागला. माझे पक्षातील मोठ्या लोकांशी संबंध आहेत. कोणी काही करू शकत नाही, अशा धमक्या देत तो तिच्यावर वारंवार बलात्कार करत राहिला, असे तिने तक्रारीत म्‍हटले आहे. कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या मुलांना मारून टाकेन, अशी धमकी तो देत असल्याने इतके दिवस तक्रार दिली नाही, असे विवाहितेने म्‍हटले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास तोफखाना पोलीस करत आहेत.