पहिल्या नवऱ्याला सोडून दुसऱ्यासोबत थाटला संसार; फेसबुकवर तिसऱ्याच्या प्रेमात पडली... अन्‌ लव्हस्टोरीचा धक्कादायक शेवट..!

 
इंदौर : पहिल्या नवऱ्याला सोडून एका महिलेने दुसऱ्याशी लग्न केले. त्यानंतर फेसबुकच्या माध्यमातून ती तिसऱ्याच्या प्रेमात पडली. प्रियकराला भेटण्यासाठी छत्तीसगढमधू मध्यप्रदेशात आली. तिथे फेसबुक लव्हरने तिला आधी विष पाजले. नंतर गळा दाबून हत्या केली. मृतदेह जंगलात फेकला. मात्र पोलिसांनी महिलेच्या कॉल डेटावरून हत्याकांडाचा उलगडा केला अन्‌ महिलेच्या फेसबुक लव्हर आणि त्याच्या साथीदाराला अटक केली.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, २७ डिसेंबरला महिलेचा मृतदेह सतना पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या एका जंगलात सापडला. घटनास्थळी महिलेची स्कुटी आणि मोबाइल सापडल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तिच्या बॅगमध्ये महिलेचा पत्ताही सापडला. ती छत्तीसगढ येथील रहिवासी असल्याचे समोर आले. ३० डिसेंबरला महिलेच्या मोबाइलवर एका व्यक्तीच्या फोन आला. त्याने पोलिसांना महिलेचा दीर असल्याचे सांगितले. तसेच महिला २२ डिसेंबरपासून स्कुटी घेऊन बेपत्ता असल्याचे सांगितले. पोलिसांनी कॉल डिटेल्सच्या आधारे संशयित म्हणून नंदू आणि अर्जुन नावाच्या दोघांना ताब्यात घेत कसून चौकशी केली त्यात दोघांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.

...म्हणून दाबला गळा!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महिला विवाहित होती. तिचे याआधी एक लग्न झाले होते. मात्र नवऱ्याला सोडून तिने संजय शाहसोबत संसार थाटला होता. दरम्यान फेसबुकवरून तिची ओळख  नंदूसोबत झाली होती. नंदू तिला भेटायला अनेकदा छत्तीसगढमध्ये सुद्धा गेला होता. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर महिला नंदूकडे लग्नासाठी आणि एकत्र राहण्यासाठी हट्ट धरीत होती.

२२ डिसेंबर रोजी ती नंदूला भेटण्यासाठी छत्तीसगढवरून स्कुटीने मध्यप्रदेशात आली होती. तिला वाटेतून दूर करण्यासाठी नंदूने मित्र अर्जुनच्या मदतीने तिची हत्या केली. आधी तिला जेवणातून विष दिले. मात्र ती न मेल्याने तिचा गळा दाबून हत्या करून मृतदेह जंगलात फेकला. विवाहित असताना ती लग्नासाठी हट्ट धरत होती म्हणून तिचा गेम केल्याचे नंदूने पोलिसांना सांगितले.