नवाब मलिकांची शरद पवारांकडून पाठराखण!

 
मुंबई (कव्हरेज गुरू वृत्तसेवा) ः नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोतील (NCB) अधिकाऱ्यांविरुद्ध आरोपांची राळ उडविणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची पाठराखण दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच केली आहे. अधिकारांचा गैरवापर होत असेल तर त्‍यांना एक्स्पोज करणे गरजेचे असून, नवाब मलिक तेच करत आहेत. त्यांच्या मुद्द्यांवर केंद्र सरकारने तातडीनं कारवाई करावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे.
दिल्लीत आज दिल्ली विधानसभेचे माजी अध्यक्ष योगानंद शास्त्री यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्‍यानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठकीत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात ठराव घेण्यात आला. त्‍या ठरावाची पवारांनी खिल्ली उडवली. हा ठराव हास्यास्पद आहे. सकाळी वर्तमानपत्रात वाचल्यावर जोक वाचल्याचा आनंद झाल्याचे ते म्‍हणाले. अशा ठरावांना महत्त्व देण्याची गरज असून, सत्ता मिळत नसल्याने नैराश्य आल्याने काहीही आरोप केले जात असल्याचे पवार म्‍हणाले.