संजय राऊतांचे शरद पवारांबद्दल कौतुकोद्‌गार!

त्‍यांनी २५ वर्षांपूर्वी सांगितले होते, ते आम्हाला दोन वर्षांपूर्वी कळाले!
 
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २५ वर्षांपूर्वी भाजपला देशाचे ऐक्य नकोय असे सांगितले होते. ते आम्हाला दोन वर्षांपूर्वी लक्षात आले. भाजप देशाला उलट्या दिशेने नेत असल्याचेही पवारांनी सांगितले होते... ते आता आम्हालाही कळायला लागले आहे, असे मत  शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्‍त केले आहे.

सध्या संजय राऊत हे शरद पवारांच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्‍न करत असून, पवारांना अपेक्षित राजकारण करण्याकडे त्‍यांचा कल दिसून येतो. यामुळे शिवसेनेतील नेत्यांत नाराजी व्यक्‍त होत असली तरी, राऊत मात्र आपल्या वागण्या बोलण्यातून पवारांची भलावण करण्याची संधी सोडत नसल्याचे दिसून येते.

शरद पवारांच्या भाषणांचा संग्रह असलेल्या ‘नेमकचि बोलणें’ पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत आज झाले. त्‍यावेळी बोलताना राऊत यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधताना पवारांवर कौतुकाचा वर्षाव केला. हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवायला हवे, अशी टिपण्णीही त्‍यांनी केली. महाराष्ट्र सतत देशाला नवीन विचार देत असतो. त्‍यामुळे पवारांच्या ६१ व्या भाषणाची प्रत मोदींना नक्कीच देऊ, असेही राऊत म्‍हणाले.

देशात सध्या विकृतीचे राजकारण सुरू असून, याबद्दल शरद पवार १९९६ साली बोलले होते, ते आता खरंच घडताना दिसत आहे, असे राऊत म्‍हणाले. मी दिल्लीत पवारांचा खुर्ची दिली म्‍हणून टीका करणाऱ्यांना हे सांगण्याची गरज आहे, की त्यांचा तो मान आहे. त्‍यामुळे खुर्ची दिली, असे राऊत म्‍हणाले.