आंतरजातीय चालते, पण आंतरधर्मीय नको!; तरुणाईचे मत, सर्वेक्षणात निष्कर्ष!!
देशातील अठरा राज्यात कोनराड आणि लोकनिती-सीएसडीएसद्वारे हे सर्वेक्षण करण्यात आले. भारतीय तरुणांचा भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि महत्त्वाकांक्षा या विषयावर हा सर्वे होता.या सर्वेनुसार भारतातील ६१ टक्के तरुण आंतरजातीय विवाह करण्यासाठी इच्छुक आहेत तर ३० टक्के तरुणांचा आंतरजातीय विवाहाला विरोध आहे. दुसरीकडे आंतरधर्मीय विवाहाला मात्र विरोध अजूनही कायम असल्याचे चित्र आहे.
४२ टक्क्यांपेक्षा अधिक तरुणांचा या आंतरधर्मीय विवाहाला विरोध आहे. आंतरजातीय विवाहाला तरुण स्वीकारत असले तरी त्यांचे हे स्वप्न साकार होत असल्याचे फारसे पुरावे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. भारतात ५५ टक्के तरुण शासकीय नोकरीला पसंती देतात. २०१६ मध्ये शासकीय नोकरीला पसंती दर्शविणाऱ्या तरुणांची संख्या ६५ टक्के होती. स्वतःचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे. १७ टक्के तरुणांना आरोग्य क्षेत्रात करिअर करावेसे वाटते.
२०१६ मध्ये केवळ ३ टक्के तरुणांना आरोग्य क्षेत्रात करिअर करायची इच्छा होती. १० पैकी दोन तरुणांच्या मनात आत्महत्येचा विचार येतो. आर्थिक स्थितीमुळे आजचे तरुण चिंताग्रस्त असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे. नोकरी, स्वतःचे दिसणे आणि आरोग्य यामुळे तरुण चिंताग्रस्त आहेत. १८ ते २४ या वयोगटातील ४९ टक्के तरुण शिक्षण घेतात तर २० टक्के तरुण पैसे कमावतात. महाराष्ट्रात रोजगाराची स्थिती वाईट असल्याचे पाच पैकी दोन तरुणांना वाटते. प्रत्येक चौथ्या तरुणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असल्याचे समोर आले आहे. मानसिक तणाव असताना ६५ टक्के तरुण हे कुटूंबाला प्राधान्य देतात तर ३ टक्के तरुण मानसिक तणावातून सावरण्यासाठी वैद्यकीय मदत घेत असल्याचे सर्वे सांगतो.