रोहित पवार म्हणाले, तसली संस्कृती भाजपाची!
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्रात १५ फेब्रुवारीपर्यंत कडक निर्बंध लादण्यात आले असून, ५ राज्यांतील निवडणुकांच्या प्रचारसभा आणि रॅलींवरही बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही राज्यांतील मुख्यमंत्र्यांसमवेत व्हर्च्युअल संवाद साधला. महाराष्ट्रातून या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे हजर होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित नव्हते. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांवर टीकेची संधी साधली.
रोहित पवार यांनी भाजप नेत्यांना प्रत्युत्तर दिले आहे. केंद्रीय नेतृत्वाची मर्जी सांभाळण्याची कसरत भाजपच्या नेत्यांना करावी लागते. तशी ती सर्वच पक्षांत, सरकारमध्ये करावी लागत असेल असे नाही. या राज्याचे आपण काही देणे लागतो या भूमिकेतून कधीतरी राज्याच्या हिताची भूमिका घ्या, असेही पवार म्हणाले. मोदींच्या बैठकीत राजेश टोपेंना बोलण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे, त्यांनी लेखी स्वरुपात आपले म्हणणे मोदींकडे दिले आहे. पोस्ट ऑपरेटिव्ह ट्रीटमेंमुळे मुख्यमंत्री ठाकरे बैठकीला गैरहजर राहिले. कारण सलग २- ३ तास त्यांना एका जागी बसणे शक्य नव्हते.