रोहिणी खडसे हल्ला ः शिवसेनेच्या ७ पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

 
file photo
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांच्यावर हल्ल्या केल्या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांनी शिवसेनेचे पदाधिकारी छोटू भोई, सुनिल पाटील व पंकज कोळी यांच्यासह अन्य चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात येऊन घटनेचा निषेध केला. रोहिणी खडसे यांनी हल्ल्याची तक्रार दिली. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे हेही पोलीस ठाण्यात आले होते. छोटू भोई, सुनिल काशिनाथ पाटील (दोघे रा. मुक्ताईनगर ), पंकज कोळी (रा. चांगदेव) आणि ४ अनोळखी व्यक्तींविरोधात दंगल, हत्यार प्रतिबंधात्मक कलमान्वये विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मुंडे यांनी दिली आहे. तपास सुरू असून, कुणाला अटक केली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
काय झालं होतं...
चांगदेव येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर रोहिणी खडसे मुक्ताईनगरकडे कारने येत होत्या.  काल रात्री सव्वा नऊला मानेगाव फाट्याजवळ त्यांच्या कारला (क्र. एमएच १९ सीसी १९१९) अडवून सात जणांनी हल्ला केला होता. तलवार, पिस्तूल आणि लोखंडी रॉड हल्ल्यासाठी वापरला. रोहिणी यांच्यावर बंदूक रोखली होती. कारमध्ये रोहिणी खडसे यांच्यासह पीए पांडुरंग नाफडे आणि गाडीचा चालक होता. सुदैवाने  रोहिणी खडसे यांना दुखापत झाली नाही. हल्ल्यानंतर हल्लेखोर लगेचच पळून गेले होते.