निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने जीवंतपणीच घातले स्वतःचे तेरावे... कारण माहितेय का?

 
file photo
अमरावती : मृत्यू हे जीवनाचे श्वाश्वत आणि अंतिम सत्य आहे. तो कधीही सांगून येत नाही. मात्र प्रत्येकाला तो येतो एवढे मात्र नक्कीच.आपल्या मृत्यूनंतर काय होते, कोण रडते, तेरव्याला कोण येते हे काही आपल्याला कळत नसते. त्यामुळे जिवंतपणीच एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने स्वतःचे तेरावे घातले आणि तो अनुभव घेतला. अमरावती जिल्ह्यातील रहाटगाव येथे नुकताच हा कार्यक्रम झाला.

सुखदेव डबरासे (६३) पोलीस दलातून पोलीस उपनिरीक्षक म्हणून ५ वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहे. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या तेराव्याचा हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी त्यांनी पत्रिका छापून स्वतःच्या हाताने पोलीस दलातील जुन्या सहकाऱ्यांना तसेच मित्रांना वाटल्या. पत्रिका पाहून सारेच अचंबित झाले.

मात्र आग्रहाचे निमंत्रण असल्याने अनेक जण या गोडजेवणाच्या कार्यक्रमाला आले होते. याबद्दल डबरासे यांनी सांगितले, की ३५ वर्षे पोलीस दलात सेवा देऊन सेवानिवृत्त झालो आहे. पाच वर्षांपासून सेवानिवृत्तीचे वेतन मिळते. माझे काही सहकारी सेवानिवृत्तीनंतर महिना, दोन महिन्यांत तर काही वर्षभरात देवाघरी गेले.

त्यांना पेन्शनचा लाभ घेता आला नाही. त्यामुळे मला ही कल्पना सुचली. स्‍नेहमीलन घेण्यापेक्षा तेरावे घालून गोडजेवन द्यावे, असा विचार मनात आला. त्यानिमित्ताने सर्व जुन्या सहकाऱ्यांच्या भेटी झाल्याचा आनंद आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या गोडजेवणाची सध्या अमरावती शहरात जोरदार चर्चा आहे.