राजपूत नेत्याची गोळ्या घालून हत्या! आधी सोफ्यावर बसले, गप्पा मारल्या अन् नंतर धडाम -धुम...! सुरक्षारक्षकाने एका गुंडाला ठोकले...
Dec 5, 2023, 17:21 IST
जयपूर(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): राष्ट्रीय राजपूत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची आज,५ डिसेंबरच्या दुपारी जयपूर येथील त्यांच्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ३ हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी प्रत्युतरात गोगामेडी यांच्या अंगरक्षकाने केलेल्या फायरिंग मध्ये एका हल्लेखोराचा मृत्यू झाला. गँगस्टर रोहित गोदारा याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
जाहिरात
जयपूर येथील श्याम नगर जनपथ येथे सुखदेव सिंह गोगामेडी यांचे घर आहे. दुपारी गोगामेडी त्यांच्या घरी असताना तिघांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. आधी सोफ्यावर बसून त्यांनी गोगामेडी यांच्याशी चर्चा केली. १० मिनिटानंतर तिघांनी एकाएकी तीन पिस्तूल काढून गोगामेडी यांच्यावर गोळ्या झाडल्या.
यावेळी सुखदेव सिंह गोगामेडी यांचा अंगरक्षक अजित सिंह यांनी प्रत्युत्तरात केलेल्या फायरिंग मध्ये एका हल्लेखोराचा मृत्यू झाला. अंगरक्षक अजित सिंह यांना सुद्घा गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गुंडांनी पळून जाताना गोगामेडी यांच्या घराजवळ एक कार अडवण्याचा प्रयत्न केला मात्र कारचालकाला पिस्तूल दिसताच त्याने तिथून कारसह सुसाट पळ काढला. त्यावेळी मागून येणाऱ्या स्कूटी चालकावर गुंडांनी फायरिंग करून त्याला जखमी करीत त्याची स्कूटी घेऊन पोबारा केला. दरम्यान ही संपूर्ण घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दुसरीकडे गँगस्टर रोहित रोदारा नावाने बनवलेल्या एक फेसबुक पेजवरून पोस्ट करून या हत्येची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे.