कौटुंबिक कलहाची तक्रार करायला आलेल्या महिलेला पीएसआयने प्रेमजाळ्यात अडकवले!; एसपींनी घेतली गंभीर दखल

 
पुणे ः कौटुंबिक कलहाची तक्रार करायला आलेल्या महिलेलाच पोलीस उपनिरिक्षकाने प्रेमजाळ्यात अडकवले. कौटुंबिक वाद कागदोपत्री तडजोडीने मिटवला. पण यादरम्‍यान महिलेचा मोबाइल नंबर पीएसआयकडे आल्याने त्‍याने त्‍याचा गैरवापर करत तिच्याशी वारंवार संपर्क केला. तिला स्पर्धा परीक्षेच्या तयारीत वाटेल ती मदत करण्याबरोबरच पुण्यात नातेवाइकांकडेही ठेवले. तिने पीएसआयच्या नावाचा टॅट्यू हातावर गोंदवलेला दाखवला तेव्हा पती हादरूनच गेला. त्‍याने पोलीस अधीक्षकांकडे या प्रकरणी तक्रार केली असून, त्‍यांनीही प्रकरण गांभीर्याने घेऊन चौकशी सुरू केली आहे. चौकशीनंतर अहवाल पोलीस अधीक्षकांना सादर केला जाईल, असे अतिरिक्त पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी सांगितले.

बारामती तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेल्या या कुटुंबातील महिलेचा विवाह २२ ऑगस्ट २०१० साली झाला. त्‍यांना दोन मुली आहेत. जून २०२१ मध्ये महिला आणि तिच्या पतीच्या नातेवाइकांत वाद झाला होता. तिने बारामती पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. प्रकरणाचा तपास या पोलीस उपनिरिक्षकाकडे सोपविण्यात आला होता. त्‍याने वाद तर मिटवला पण तक्रारदार महिलेचा वैयक्तिक मोबाइल क्रमांकही मिळवला.

ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याचे कळल्यानंतर त्‍याने वाटेल ती मदत करण्याचे आश्वासनही दिले. त्‍यामुळे महिलेनेही पतीकडे एमपीएससी करण्याचा हट्ट धरला. त्यामुळे पतीने परवानगी देत नोव्हेंबर २०२१ मध्ये तिला त्या पोलीस अधिकाऱ्याच्या पुण्यातील नातेवाइकांच्या घरी सोडले. सुरुवातीला एक अधिकारी सहकार्य करतोय, असे पतीलाही वाटले पण महिला आणि अधिकाऱ्यात काहीतरी वेगळेच शिजतेय हे कळायला त्‍याला जरा उशिरच लागला.

तिने पती आणि मुलींशी संपर्क तोडायला सुरुवात केली. पतीने तिला जाब विचारला असता तिने पीएसआयच्या नावाचा कोरलेला टॅट्यू पतीला दाखविला. त्‍याने तिच्या आई-वडिलांना हा प्रकार सांगणार असल्याचे म्‍हटल्‍यावर पोलीस अधिकाऱ्याने त्‍याला हातपाय तोडण्याची धमकी दिली व पत्‍नीला सोडून द्यायला सांगितले. तिला माझ्या कंपनीत १० टक्के भागीदारी देणार आहे. तुला काय करायचे ते कर, असेही पीएसआयने धमकावल्याने पतीने म्‍हटले आहे. दरम्‍यान, पतीच्या तक्रारीनंतर पोलीस दलातही खळबळ उडाली असून, अशाप्रकारे तक्रारदारांच्या अडचणीचा गैरफायदा उचलल्याबद्दल दलातूनही पीएसआयवरबद्दल नाराजी व्यक्‍त केली जात आहे. यातून पोलीस दलाची प्रतिमा खराब होत असल्याने पोलीस अधीक्षकांनी प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. पीएसआयला सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी पतीने केली आहे.