शिवसेना आमदाराला अश्लील व्हिडिओ कॉल!
राजकीय नेतेही ठरताहेत त्या तरुणींचे बळी!!
Nov 26, 2021, 01:09 IST
मुंबई : फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची. मैत्री करायची. अश्लील व्हिडिओ कॉल करण्याची तयारी दाखवायची आणि मग त्याच व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करायचे असे प्रकार काही तरुणींकडून सर्रास सुरू आहेत. या तरुणींना या कामासाठी काही भामटे वापरत असल्याचेही समोर आले आहे. हे एक मोठे रॅकेटच आहे. अनेक तरुण या जाळ्यात फसल्याचे वारंवार समोर आले आहे. मात्र मुंबईतील शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांनाही या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली. अशा प्रकारच्या ब्लॅकमेलिंगला ‘सेक्सटॉर्शन’ म्हणतात.
बुलडाणा जिल्ह्यातही असे प्रकार समोर आले होते. निवडणुकांच्या कालावधीत या पद्धतीचा वापर करून राजकीय पदाधिकारी, नेत्यांना ब्लॅकमेल केले जाऊ शकते, ही शक्यता विचारात घेऊन आता पोलीसही सतर्क झाले आहेत. महिला बोलत असल्याचे भासवून आ. कुडाळकर यांना अश्लील व्हिडिओ कॉल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना पैसे मागण्यात आले होते. मुंबई सायबर पोलिसांनी या प्रकरणात एका तरुणाला राजस्थान येथून अटक केली होती. या घटनेमुळे राजकीय नेते, कार्यकर्त्यांनीही काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण त्यांना भेटायला येणारी मंडळी भरपूर असते. ते फोनवर, चॅटिंगवर सहज उपलब्ध होत असल्याने सायबर गुन्हेगारांनी थेट त्यांच्याकडेच मोर्चा वळवल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता नेत्यांनी सोशल मीडिया हाताळताना काळजी घेण्याची गरज आहे.