दिंडीत पिकअप वाहन घुसले; २ महिला वारकरी ठार, ३० जखमी

पुणे जिल्ह्यातील भीषण अपघात
 

पुणे ः वारकऱ्यांच्या दिंडीत पिकअप वाहन शिरल्याने दोन महिला वारकरी जागीच ठार तर ३० वारकरी जखमी झाले आहेत. ही घटना आज, २७ नोव्‍हेंबरला सकाळी सातच्या सुमारास मावळ (जि. पुणे) तालुक्यातील सातेगावाजवळ घडली. वारकरी कार्तिकी यात्रेनिमित्त खालापूर येथून आळंदीला निघाले होते. वडगाव मावळ पोलिसांनी पिकअप चालकाला ताब्‍यात घेतले आहे. जखमी वारकऱ्यांना वेगवेगळ्या रुग्‍णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

माऊली कृपा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ही दिंडी काढण्यात आली होती. रायगडच्या खालापूर तालुक्यातील उंबरे, कर्जत, खालापूर, खोपोली भागातील २०० वारकरी दिंडीत होते. अपघातात सविता वाळकू येरभ (५८, रा. उंबरे, ता. खालापूर, जि. रायगड) व जयश्री आत्माराम पवार (५४, रा.भूतवली, ता. कर्जत, जि. रायगड) यांचा जागीच मृत्यू झाला. मंदा बापू वाघमारे, वनिता बबन वाघमारे, रंजना गणेश वाघमारे, राजश्री राजेश सावंत (सर्व रा. उंबरे), माणिक कर्णक, सुरेखा तुळशीराम कर्णक, वंदना राम कर्णक (तिघेही रा. बीड खुर्द), अनुसया जाधव, बेबी कदमुख, अनुसया मधुकर जाधव,  शोभा सावंत, पुष्पा पालकर, दिव्या दीपक धंदावकर, आशा साबळे, रामदा आहेर, सोनाबाई धोरगे, पुष्पांजली कर्णक, सुभद्रा सिताराम शिंदे, बेबी सावंत, दिव्या चांदूरकर, सुरेखा चोरगे, सुभद्रा सदाशिव चोरगे, रंजना अशोक कर्णक, राधिका बाळकृष्ण भगत यांचा जखमींत समावेश आहे. वारकरी हरिनामाचा गजर करत रस्त्याच्या कडेने जात होते. जवळून जाणारे पिकअप अचानक नियंत्रण सुटून दिंडीच्या मधोमध घुसले. वारकऱ्यांना पिकअपची जबर धडक बसली.