विकृत पोरगं... महिला, मुलींना व्हिडिओ कॉल करायचं अन्‌ व्हायचं नग्न!

 
file photo
औरंगाबाद (वृत्तसंस्‍था) ः औरंगाबादमध्ये एका विकृत तरुणाचा घाणेरडा कारनामा समोर आला आहे. तरुणींना इन्स्टग्राम या सोशल मीडिया साईटवर व्हिडिओ कॉल करून व त्यामध्ये नग्न होत अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाला औरंगाबाद सायबर पोलिसांनी अटक केली आहे. अनेक महिलांना आणि तरुणींना त्याने व्हिडिओ कॉल करून परेशान केल्याचे समोर आले आहे. पंकज गोविंद खांदवे (२४, रा. पिंपळणारे, ता. दिंडोरी, जि. नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या भामट्याचे नाव आहे.

एका महिलेने सायबर पोलीस ठाण्यात महिनाभरापूर्वी या प्रकरणाची तक्रार दिली होती. सोशल मीडियावर तिचे खाते असून इन्‍स्टाग्रामवर तिला सतत मेसेज आणि व्हिडिओ कॉल येत होते. एक तरुण व्हिडिओ कॉल करून नग्न होऊन त्यात अश्लील कृत्य करत होता. यावरून सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सायबर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बारकाईने तांत्रिक पद्धतीने तपास केला.

महिलेच्या नावाने तयार करण्यात आलेल्या खात्याचा खरा युजर हा पंकज गोविंद खांदवे असल्याचे तपासात निष्पन्‍न झाले. त्यामुळे सायबर पोलिसांच्या टीमने त्याला नाशिक जिल्ह्यातून ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी इंगा दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. हा सर्व प्रकार फक्त टाईमपास करण्यासाठी केला असल्याचं आरोपीने पोलिसांना सांगितले. याआधीही अनेक महिलांना इन्‍स्टाग्रामचा वापर करून तो परेशान करत होता, अशी कबुली त्याने दिली आहे.