ओवेसींचे भडकावू भाषण व्हायरल! पोलिसांना म्हणाले, मोदी अन् योगी गेल्यावर तुम्हाला कोण वाचवणार?
उत्तरप्रदेश पोलिसांना मी धमकी दिली नाही. हरिद्वारमध्ये हिंदुत्ववाद्यांनी दिलेल्या भाषणावरून लक्ष विचलित करण्यासाठी माझा कानपूर येथील व्हिडिओ व्हायरल केला जातोय, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. मी भाषणात पोलिसांकडून होत असलेल्या अत्याचाराबद्दल बोललो होतो. माझ्या व्हिडिओला अर्धवट दाखवले जात आहे. ज्या पोलिसाने ८० वर्षांच्या वृद्धावर अत्याचार केले, एका रिक्षाचालकाला गर्दीतले लोक मारहाण करत असताना जे पोलीस गप्प बसतात त्या पोलिसांसंदर्भात मी बोललो होतो, असे ओवैसी यांनी म्हटले आहे.
कानपूर येथे झालेल्या वंचित समाज संमेलनात ओवेसी यांनी योगी आणि मोदी सरकारच्या विरुद्ध प्रचंड टीका केली होती. उत्तर प्रदेशात दाढीवाल्यांवर पोलीस अत्याचार करतात. आमच्या दाढीशी एवढे काय शत्रुत्व आहे, असे ओवेसी म्हणाले होते. लक्षात ठेवा नेहमी मोदी पंतप्रधान आणि योगी मुख्यमंत्री राहणार नाही, असे ते म्हणाले होते. आम्ही तुमचे अत्याचार विसरणार नाही,अन्याय लक्षात राहील मात्र एक दिवस परिस्थिती बदलेल. मोदी डोंगरात आणि योगी मठात गेल्यावर तुम्हाला कोण वाचवणार, असे विधान ओवेसी यांनी केले होते.