ओमिक्रॉन : पुढचे ८ दिवस महत्त्वाचे!

देशात कोरोनाची तिसरी लाट येणार का?
 
नवी दिल्ली : कोरोनाचा नवा ओमिक्रॉन हा भयंकर विषाणू समोर आल्यानंतर देशातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. ओमिक्रॉनचे आजपर्यंत कर्नाटकमध्ये दोन, गुजरात आणि महाराष्ट्रात प्रत्‍येकी एक रुग्ण आढळल्याने चिंता वाढली असून, कोरोनाची तिसरी लाट येणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. याचं उत्तर मात्र पुढच्या आठ दिवसांत मिळणार असून, ती येऊ नये यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
लसीकरणाची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी देशस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. लोकांनीही कोरोनाविषयक नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. तूर्त घाबरण्याची गरज नाही पण सर्वांनी सतर्क राहायला पाहिजेत, असे राज्य सरकारच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी म्‍हटले आहे. दरम्‍यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, जम्मू-काश्मीर, ओदिशा आणि मिझोरमला पत्र लिहून अलर्ट राहण्याची सूचना केली आहे. टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रिटमेंट, लसीकरण, कोविड प्रोटोकॉलचं पालन या पंचसूत्रीचे पालन सक्‍तीचे करवून घेण्याचे आदेश दिले आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर नजर ठेवा, हॉटस्पॉटवर लक्ष द्या, संक्रमितांचे नमुने जिनॉम सिक्वन्सिंगसाठी पाठवा, अशा सूचना दिल्या आहेत.