नर्स ठरली हैवानीयतची शिकार!; डॉक्‍टरासह त्‍याच्‍या तीन मित्रांनी केला लैंगिक अत्‍याचार!!

 
file photo
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये वैद्यकीय व्यवसायाला काळिमा फासणारे कृत्य गारखेडा परिसरातील एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरने केले आहे. २५ वर्षाच्या या आरएमओ डॉक्टरने नर्सवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. यामुळे नर्स गर्भवती राहिली. त्यामुळे डॉक्टरने तिला गर्भपाताच्या गोळ्या खायला देऊन विनापरवानगी गर्भपात केला. डॉक्टरच्या तीन मित्रांनी सुद्धा तिचा विनयभंग केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दामिनी पथकाने नर्सची मदत केली व मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

डॉ. प्रसाद संजय देशमुख (२५), हॉटेलचा मालक दीपक पाटील, मेडिकल दुकानाचा चालक सचिन शिंदे याच्यासह आणखी एकाचा आरोपींमध्ये समावेश आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय पीडित नर्स आणि डॉ. प्रसाद देशमुख एकाच हॉस्पिटलमध्ये काम करत होते. नोव्हेंबर २०२१ पासून देशमुखने तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर पडेगाव येथील एका फ्लॅटवर आणि दुसऱ्या अन्य एका ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे नर्स गरोदर राहिली.

प्रसादने गर्भपाताच्या गोळ्या खायला दिल्या व गर्भपात केला. गर्भपाताच्या वेळी पीडितेला प्रचंड वेदना झाल्या. त्यामुळे ती पुन्हा डॉक्टरकडे गेली. डॉ. प्रसादने तिला मुकुंदवाडी भागातील एका नातेवाइकाच्या हॉटेलमध्ये नेले आणि त्याही परिस्थितीत तिच्यावर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला. डॉक्टरचा मावस भाऊ आणि हॉटेलचा मालक असलेला दीपक पाटील याने सुद्धा तिच्यावर जबरदस्तीचा प्रयत्न केला. कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटून ती बाहेर पडली.

डॉक्टरचा मित्र असलेला सचिन शिंदे आणि आणखी एकाने सुद्धा तिचा विनयभंग केला. पीडित नर्स कशीबशी सिडको बसस्थानकावर आली. गर्भपातामुळे व जबरदस्तीमुळे तिची तब्येत खालावली होती. पीडित नर्स सिडको बसस्थानकात येऊन बसली होती. गर्भपातामुळे तिला प्रचंड वेदना होत होत्या. त्यामुळे तेथील सुरक्षारक्षकाने दामिनी पथकाला कळवले. दामिनी पथकाच्या प्रमुख  उपनिरीक्षक सुवर्ण उमाप, लता जाधव, निर्मला निंभोरे, मनीषा बनसोडे ,गिरिजा आंधळे यांनी सिडको बसस्थानक गाठून पीडित नर्सची विचारपूस करून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर डॉक्टर प्रसाद विरुद्ध व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.