नक्षलवादी ते सभापती...

या महिलेची चित्तथरारक जीवनकथा ऐकून तुम्‍हीही व्हाल थक्‍क!
 
File Photo

गडचिरोली (कव्हरेज गुरू वृत्तसेवा) ः घनदाट जंगलात दहा वर्षे नक्षलवादी म्हणून आयुष्य जगल्यांतर नक्षल चळवळीला रामराम ठोकून थेट पंचायत समितीच्या सभापतिपदी आरूढ झालेल्या गडचिरोली जिल्ह्यातील गिरीजा भलावी या महिलेचा जीवनप्रवास थक्‍क अन्‌ तितकाच थरारक आहे. खडतर आणि संघर्षपूर्ण आयुष्यातून बाहेर पडल्यानंतरही कल्याणकारी व आदर्श जीवन जगता येते हेच गिरीजा भलावी यांच्यामुळे समोर आले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील आरेवाडा या छोट्याशा गावातील कुडीयानी परिवारात गिरीजा यांचा जन्म झाला. नक्षलवादी चळवळ काय असते, ती कशासाठी असते हे माहीत नसतानाच्या वयात त्या नक्षलवाद्यांसोबत गेल्या आणि नक्षलवादी बनल्या. नक्षल दलामधील पवनकुमार भलावी याच्यासोबत त्यांचं लग्नही झालं. दहा वर्षे नक्षली म्हणून खडतर आयुष्य त्या जगल्या. २००१ मध्ये त्यांचे पती पवनकुमार भलावी यांची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करणे आवश्यक झाले. दोघेही गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात आले. पवनकुमार यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. गिरिजा त्यांची सेवा करत होत्या. नक्षलवादी गिरीजा आणि पवनकुमार रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दोघा पती-पत्नींना अटक केली. अटक झाल्यानंतरही गिरीजा डगमगल्या नाहीत.

कारागृहात राहून त्यांनी वकिलांच्या मदतीने कायदेशीर लढाई लढली आणि न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर नक्षलवाद सोडून हे दाम्‍पत्य सामान्य माणसाप्रमाणे जीवन जगू लागले. मात्र सामान्यांची सेवा करण्याची तळमळ त्यांना शांत बसू देत नव्हती. २००५ साली ग्रामपंचायतीची निवडणूक लढवून त्या सदस्य झाल्या. एवढ्यावरच न थांबता २००७ मध्ये भामरागडच्या पंचायत समितीच्या सभापतिपदाची निवडणूक लढवून त्या बहुमताने निवडून आल्या आणि सभापती झाल्या. आदिवासींपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचल्या पाहिजेत यासाठी शासनाशी भांडून त्‍यांनी अनेक लोक कल्याणकारी निर्णय घेतले. २०१२ च्या निवडणुकीत अवघ्या एका मताने गिरिजा पराभूत झाल्या. मात्र त्यांच्या पराभूत होण्याला सुद्धा मोठे कारण होते. नक्षली जीवन सोडून समाजसेवा करीत असल्याने नक्षलवाद्यांनी निवडणुकीपूर्वी आरेवाडा येथे त्यांच्या शेतात गिरीजा यांच्या पतीची हत्या केली. त्यानंतर लोकसेवेचा एकाकी संघर्ष त्यांनी सुरू केला. विशेष म्हणजे राजकारण हे वैयक्तिक स्वार्थाचे नाहीतर विकासाचे साधन आहे, असं त्या म्हणतात. स्वतःचे पोट भरण्यासाठी त्या शेतात राबतात. मत्स्य पालन, कुक्कुटपालन, प्रगतिशील शेती करतात. राजकारणाच्या माध्यमातून जनसेवा करण्याची इच्छा त्यांची आजही आहे. पण निवडणुकीच्या राजकारणात सुरू झालेल्या पैशांच्या बजबपुरीत त्यांना संधी नाही. मात्र त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे एवढे मात्र नक्कीच.