नवीकोरी स्‍कुटी घेतली... पण नंबर आला अन्‌ तरुणीने डोक्‍यावर हात मारला..!

आता गाडी घेऊन बाहेर पडायला तिला वाटतेय लाज!!
 
 
नवी दिल्ली ः सध्या दिल्लीतील एक कॉलेज तरुणी तिच्या स्‍कुटीच्या नंबरमुळे हैराण आहे. आता तुम्‍ही म्‍हणाल, गाडीचा नंबर आणि हैराण होण्याचा काय संबंध? तिच्या स्‍कुटीचा जो नंबर दिल्लीच्या आरटीओ विभागाने दिला आहे, त्‍याची सिरिज S.E.X. या इंग्रजी आद्याक्षराने सुरू होत आहे. त्‍यामुळे तरुणीला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही टवाळखोरांनी तर तिला भररस्त्यात अपशब्द बोलून सतावले. यामुळे त्रस्‍त झालेल्या तरुणीने नंबर बदलून देण्याची मागणी आरटीओ अधिकाऱ्याकडे केली आहे.
तरुणी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. साठवलेल्या पैशांतून तिला कॉलेजला जाण्यायेण्यासाठी तिच्या वडिलांनी स्कुटी गिफ्ट केली होती. मात्र जेव्हा स्कुटीचा नंबर आरटीओने दिला, तेव्हा हे कुटुंब चिंतित झाले. नंबरची सीरिज S.E.X. या अक्षरांपासून सुरू होते. ही अक्षरे विचित्र असल्याने तिला नवी गाडी घराबाहेर नेणेही अवघडल्यासारखे जाऊ लागले. एकदा भावासोबत ती स्‍कुटीवरून जात असताना काही टवाळखोरांनी दोघांना अपशब्‍द बोलून सतावले. दिल्ली आरटीओच्या अधिकाऱ्यांकडे याविषयी तक्रार केली असता त्‍यांनी आतापर्यंत १० हजार गाड्यांसाठी या सिरिजचे नंबर दिल्याचे सांगितले. तरुणीचा अर्ज स्वीकारला असला तरी, नंबर बदलून देण्याची तरतूद नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही प्रक्रिया सेट पॅटर्ननुसार चालते, असे कमिश्नर ऑफ दिल्ली ट्रान्सपोर्ट के.के.दहिया यांनी सांगितले आहे. त्‍यामुळे तरुणी हैराण झाली आहे. आता दुसरा नंबर येईपर्यंत ही स्‍कुटीच न वापरण्याचा निर्णय तिने घेतला आहे.