'नरेंद्र मोदी अन् योगी आदित्यनाथ भगवान विष्णूचे अवतार!'
Dec 30, 2021, 13:10 IST
अकोला : छत्तीसगढ येथील धर्मसंसदेत महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर कालीचरण महाराज देशभरात चर्चेत आले आहेत. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना अनेकांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. दुसऱ्या बाजूला उजव्या विचारसरणीचे अनेक जण कालीचरण महाराज यांचे समर्थन करत आहेत. छत्तीसगढमध्ये कालीचरण महाराजांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र त्यानंतरही मला माझ्या विधानाचा पश्चाताप नाही, असे त्यांनी म्हटले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भगवान विष्णूचे अवतार आहेत, असे नवे विधान त्यांनी केले आहे.
न्यूज १८ इंडिया या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात कालीचरण महाराजांनी हे विधान केले. तुम्ही गांधीजींना शिविगाळ केली हे खरे आहे का, असा प्रश्न त्यांना अँकरने विचारला होता. त्यावर गांधींना शिव्या दिल्याचा मला पश्चाताप नाही. माझ्या मनातल्या वेदना जाग्या झाल्या, त्या रागाने बाहेर पडल्या. त्यामुळे मी तसे बोललो, असे कालीचरण महाराज म्हणाले. मी गांधींना संत आणि महात्मा मानत नाही. त्यांनी हिंदूंसाठी काय केले? त्यांनी जनतेचा विश्वासघात केला, असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदी गांधीजींची पूजा करतात अन् तुम्ही शिविगाळ असे विचारल्यावर ते म्हणाले, की मोदी आणि योगी यांना मी भगवान विष्णूचा अवतार मानतो.