आईला अल्पवयीन मुलीच्या पर्समध्ये सापडल्या गर्भनिरोधक गोळ्या, प्रेग्नंन्सी किट; समोर आली धक्कादायक स्टोरी!

 
औरंगाबाद : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याच्या घटना सध्या समाजात वाढताना दिसत आहेत. आधी प्रेमाचे नाटक करायचे, लग्नाचे आमिष दाखवायचे, शरीराचा उपभोग घ्यायचा अन्‌ नंतर सोडून द्यायचे. यामुळे अनेक अल्पवयीन मुली, तरुणीच्या आयुष्याचे वाटोळे होताना दिसत आहे. नुकतीच औरंगाबाद शहरात एका १५ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मुलीच्या आईला मुलीच्या पर्समध्ये गर्भनिरोधक गोळ्या आणि प्रेग्नंसी किट सापडल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसात तक्रार दिल्यानंतर  अरविंद सदावर्ते (रा. बजाजनगर, मूळ रा. दाभा, ता. जिंतूर, जि. परभणी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी बजाजनगरात आई आणि सावत्र वडिलांसोबत राहते. ती स्कुटीवरून शिवन क्लासला जात असते. दोन महिन्यांपूर्वी ती स्कुटीने क्लासला जात असताना तिची गाडी मोहटादेवी मंदिराजवळ बंद पडली. त्याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या अरविंदला तिने मदत मागितली. मदत करत असताना त्याने तिचा मोबाइल नंबर घेतला.

गाडी बंद पडल्याची माहिती तिच्या आईला फोनवरून दिली. त्यानंतर मुलीचा नंबर मिळाल्याने जाम खुश झालेला अरविंद तिला नेहमी कॉल करू लागला. फोनवर बोलता बोलता दोघांचे प्रेम जुळले. एका खोलीवर ते दोघे एकमेकांना भेटू लागले. पंधरा दिवसांअगोदर मुलीच्या आईला तिच्या पर्समध्ये गर्भनिरोधक गोळ्या आणि प्रेग्नंन्सी किट सापडली. आईने तिला विचारणा केली असता तिने स्कुटी चालू करण्यासाठी मदत करणाऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळल्याचे सांगितले.

लग्नाचे आमिष दाखवून त्याने घरी नेऊन शारीरिक संबंध ठेवले. या प्रसंगाचा मोबाइलमध्ये गुपचूप व्हिडिओ काढला व तो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे तिने आईला सांगितले. त्यामुळे तो वारंवार शारीरिक संबंध ठेवायचा, असेही तिने सांगितले. ही धक्कादायक कहानी ऐकल्यानंतर पीडित मुलीचे आई- वडील ओळखीच्या लोकांना घेऊन सदावर्तेकडे गेले. त्याला घडल्या प्रकारचा जाब विचारल्यावर तो लग्नाला तयार असल्याचे त्याने सांगितले.

लग्नाची बोलणी करायला तुझ्या आई- वडिलांना घेऊन ये, असे मुलीच्या आई- वडिलांनी सदावर्ते याला सांगितले. शारीरिक संबंधाचे शूटिंग असलेला मोबाइल जप्त केले. त्यानंतर तो त्याच्या मूळगावी दाभा (ता. जिंतूर) येथे गेला. मात्र बरेच दिवस होऊनही तो न परतल्याने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून, त्याला ३१ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.