घरातील पावणेदोन लाख रुपये घेऊन अल्पवयीन मुलगी गायब!; कपडे, शैक्षणिक कागदपत्रेही सोबत नेली!!; औरंगाबादची धक्कादायक घटना

 
file photo
औरंगाबाद ः बारावीत शिकणारी मुलगी कॉलेजला गेली, मात्र घरी परतली नाही. स्कुटी आणि स्कुटीची चावी कॉलेजच्या वॉचमनजवळ देऊन मुलगी पसार झाली. बापाने कर्ज काढून घरातील कपाटात ठेवलेल्या पैशांपैकी १ लाख ७०  हजार रुपयेसुद्धा तिने सोबत नेले. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्‍तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

१७ वर्षीय मुलगी औरंगाबादच्या जवाहर कॉलनीतील विष्णूनगरात कुटुंबासह राहते. तिचे वडील एका नामांकित महाविद्यालयात नोकरीला आहेत. मुलगी देवगिरी कॉलेजमध्ये यंदा १२ वी सायन्सला होती. कॉलेजला ये- जा करण्यासाठी वडिलांनी तिला स्कुटी घेऊन दिली होती. मोठी असल्याने घरातली बरेचशे व्यवहार वडिलांनी मुलीच्या हाती दिले होते. त्‍यामुळे वडिलांनी कर्ज काढून आणलेले पैसे कुठे ठेवले आहेत हेही तिला माहीत होते.

२९ डिसेंबरला नेहमीप्रमाणे स्कुटी घेऊन मुलगी कॉलेजला गेली. मात्र संध्याकाळी ४ पर्यंतही ती परतली नाही. वडिलांनी कॉलेजमध्ये जाऊन चौकशी केली असता "तुमच्या मुलीने स्कुटीची चावी माझ्याकडे दिली आहे. वडील आल्यानंतर चावी माझ्या वडिलांना द्या, असे मुलीने सांगितल्याचे वॉचमनने सांगितले. वडिलांनी कॉलेज परिसरात मुलीचा शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. वडिलांनी घरी येऊन तपासणी केली असता तिची शाळेची सर्व कागदपत्रे गायब होती.

मुलीचे कपाटात कपडे आहेत की नाही हे पाहण्यासाठी वडिलांनी कपाट उघडले असता कपडेही गायब होते. एसबीआय बँकेतून त्यांनी २ लाख १० हजार रुपये कर्ज घेतले होते. ते पैसे त्यांनी कपाटात ठेवले होते. त्यातील १ लाख ७० हजार रुपयेसुद्धा गायब असल्याने मुलीच्या वडिलांनी संध्याकाळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. फूस लावून माझ्या मुलीचे अपहरण करण्यात आले, असे वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे.