घरच्यांचा विरोध पत्करून लग्न; पण क्षुल्लक कारणावरून पत्नीचा गळा घोटला!
सपना पुण्यात एमपीएससीची तयारी करत होती. याच दरम्यान तिची ओळख मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून कराडचा ट्रान्सपोर्ट व्यावसायिक हेमंत मोहिते याच्याशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात आणि नंतर लग्नात झाले होते. घरच्यांची परवानगी नसताना २८ ऑक्टोबर २०२१ रोजी सपना आणि हेमंत यांनी आळंदी येथे लग्न केले होते. मात्र सपनाच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळे घरच्यांनी तिला हेमंतशी फारकती घ्यायला सांगितली होती.
मागील काही दिवसांपासून दोघे वेगवेगळ्या हॉटेल्स आणि लॉजमध्ये वास्तव्यास होते. मात्र १८ डिसेंबर रोजी रात्रीला ओयो टाऊनहाऊस हॉटेलमध्ये मुक्कामाला असताना हेमंत आणि सपना यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. याच वादातून हेमंतने सपनाचा गळा आवळून खून केला. या प्रकरणात सपनाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हेमंत मोहिते याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.