ममता मुंबईत! ठाकरेंऐवजी केवळ पवारांना भेटून जाणार!!

 
मुंबई ः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज, ३० नोव्‍हेंबर आणि उद्या, १ डिसेंबरला मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्याने ते ममतांना भेटू शकणार नाहीत. पण शिवसेना खासदार संजय राऊत आणि मंत्री आदित्‍य ठाकरे त्‍यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही त्‍या भेट घेणार आहेत. आधी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीचे नियोजन होते. मात्र आता केवळ पवारांनाच भेटून त्‍यांना माघारी फिरावे लागणार आहे.
उद्या, १ डिसेंबरला त्‍या मुंबईतील उद्योजकांशी चर्चा करणार असून, प. बंगालमध्ये गुंतवणूक वाढविण्याचे आवाहन करण्याची शक्‍यता आहे. काँग्रेसशी ममतांचे सध्या पटत नाहीत. देशात विरोधी आघाडीचे नेतृत्त्व काँग्रेसने करण्यावरून त्‍यांचे मतभेद आहेत. त्‍यामुळे त्‍या केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्‍यांनाच मुंबईत भेटणार आहेत. पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये प. बंगालमध्ये जागतिक व्यापार परिषद होणार आहे. परिषदेत अधिकाधिक उद्योजकांनी सहभागी व्हावे, यासाठी ममता उद्योजकांना आवाहन करणार आहेत. शिवाय खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाच्या स्वागत सोहळ्यालाही त्‍या उपस्थित राहणार आहेत.