लालपरीचे स्‍टेरिंग आता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हाती!; वाढत्‍या आत्‍महत्‍यांमुळे संपकरी कर्मचाऱ्यांचे यापुढे निलंबन नाही!!

 
मुंबई ः एसटी कर्मचाऱ्यांपाठोपाठ त्यांच्या कुटुंबीयांनीही आत्महत्या करण्याचा इशारा दिल्याने एसटी महामंडळ हादरून गेले आहे. त्‍यामुळे यापुढे कर्मचाऱ्यांचे निलंबन न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे बससेवा सुरू करण्यासाठी आता वरिष्ठ अधिकारी चालक आणि वाहक होणार असून, तसे आदेश महामंडळाने काढले आहेत. त्‍यामुळे वरिष्ठ अधिकारी नाराज झाले आहेत.

यांत्रिक कर्मचारी व सहायक वाहतूक निरीक्षक हे चालक आणि वाहतूक नियंत्रक हे वाहक म्‍हणून आता काम करतील. एसटी कर्मचाऱ्यांना ८५ दिवसांपासून वेतन मिळालेले नाही. त्‍यामुळे ६५ हजारांहून अधिक कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. घरखर्चासाठीही पैसे नसल्याने सोलापूरमधील अमर तुकाराम माळी (२०) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्‍याचे वडील एसटी कर्मचारी असून, आंदोलनात सहभागी आहेत.

एसटीच्या ८० संपकरी कर्मचाऱ्यांनी आजवर आत्‍महत्‍या केली आहे. दुसरीकडे महामंडळाकडे मात्र केवळ ३२ आत्महत्यांची नोंद आहे. आत्महत्यांच्या घटना रोखण्यासाठी एसटी महामंडळ आता कर्मचाऱ्यांचे निलंबन करणार नाही. सध्या जे कर्मचारी निलंबित केले आहे, त्‍यांच्‍यावर मात्र बडतर्फीची कारवाई होणार आहे. आजवर ११,०२४ कर्मचारी निलंबित करण्यात आले असून, ४,४७२ कर्मचारी बडतर्फ केले आहेत. बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस ६,४३१ कर्मचाऱ्यांना  देण्यात आली आहे.