ठाकरे घराण्याची सून होणार हर्षवर्धन पाटलांची लेक!
२८ डिसेंबरला मुंबईत लग्न
Dec 8, 2021, 16:06 IST
मुंबई ः माजीमंत्री आणि भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता लवकरच ठाकरे घराण्याची सून होणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू निहार ठाकरेंसोबत २८ डिसेंबरला अंकिताचा विवाह होणार आहे. मुंबईतील आलिशान हॉटेलमध्ये मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होईल. अंकिता सध्या पुणे जिल्हा परिषदेची सदस्य आहेत.
अंकिता काँग्रेसमध्ये असून, इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या निर्देशक पदावरही कार्यरत आहेत. लंडनमधील हार्वर्ड विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी शिक्षण घेतले आहे. त्यांचे वडील हर्षवर्धन पाटील यांनी २०१९ साली विधानसभा निवडणुकांच्या काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. नंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. निहार शिवसेनाप्रमुखांचे दिवंगत पुत्र बिंदूमाधव ठाकरे यांचे पूत्र असून, सध्या मुंबईतच वकिली करतात. बिंदूमाधव यांचे १९९६ साली अपघाती निधन झाले होते. निहार ठाकरे हेही हार्वर्ड विद्यापीठात शिकत होते. तिथेच अंकिता यांच्याशी त्यांची ओळख झाल्याचे सूत्रांनी सांगितले. हर्षवर्धन पाटील यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनाही लग्नाचे आमंत्रण दिले आहे.