भररस्त्यात १७ वर्षीय मुलीला किस; तरुणाला जन्माची अद्दल!
Nov 7, 2021, 12:52 IST
मुंबई ः १७ वर्षीय मुलीला भररस्त्यात अडवून किस करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाला मुंबई सत्र न्यायालयाने जन्माची अद्दल घडवली आहे. त्याला ४ वर्षांचा कारावास सुनावला आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणाने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
गेली ७ वर्षे या प्रकरणात सुनावणी सुरू होती. ही घटना २०१४ साली गोरेगावमध्ये घडली होती. महाविद्यालयात शिकणाऱ्या पीडित मुलीचा हा तरुण पाठलाग करायचा. घटनेच्या दिवशी सायंकाळी पीडित मुलगी काही मैत्रिणींसोबत गोरेगाव परिसरातील बसस्थानकावर उभी होती. त्यावेळी तरुण तिथे आला आणि त्याने तिचा हात धरत थेट तिला किस केलं. भररस्त्यात झालेल्या या कृत्याने मुलगी घाबरून गेली. तिने तरुणाला धक्का देत घराकडे धाव घेतली. या प्रकरणात तिच्या घरच्यांसोबत येऊन तिने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी तरुणाला अटक केली होती. सबळ पुराव्यांआधारे न्यायालयाने आता त्याला चार वर्षांचा तुरुंगवास सुनावला आहे.