पाचोरा येथे पत्रकारावर आ. किशोर पाटील यांच्या गुंडाकरवी बेदम मारहाण; बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाकडून कठोर कारवाईची मागणी; निवेदन दिले !
Aug 10, 2023, 19:54 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर गुंडाकरवी भ्याड हल्ला केल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार किशोर पाटील यांच्याविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करून, त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाचोरा येथील एका घटनेसंदर्भात संदीप महाजन यांनी बातमी दिली होती. त्याचा राग धरून पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार महाजन यांना चार दिवसांपुर्वी फोन करून अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली होती. ही क्लीप व्हायरल झाल्यावर आमदारांनी साळसुदपणे शिविगाळीचे समर्थन देखील केले होते. या घटनेची संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटली होती. मात्र तेव्हा संदीप महाजन यांनी समन्वयाची, सामंजस्याची भूमिका घेतली. तरीही आमदारांची खुमखुमी थांबत नव्हती. दरम्यान, गुरुवारी संदीप महाजन रेल्वे आंदोलनाची बातमी कव्हर करून घरी परतत असताना चार पाच जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. नगर पालिकेसमोर ज्या चौकात हल्ला झाला तो चौक महाजन यांच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांच्या नावानं ओळखला जातो. येथेच त्यांना लाथाबुक्कयांनी बेदम मारहाण केली आहे. महाजन त्यात गंभीर जखमी झाले आहेत. संदीप महाजन यांनी पोलिसात तक्रार दिली असून आ. किशोर पाटलांनीच आपल्यावर गुंडाकरवी हल्ला केल्याची तक्रार केली आहे.
सत्य बातमी देणाऱ्या पत्रकारांचा आवाज बंद करण्याच्या घटना महाराष्ट्रात सातत्यानं घडत आहेत. माध्यमांच्या प्रतिनिधींना काम करणे अशक्य झाले असून राज्यात माध्यम स्वातंत्र्यच धोक्यात आले आहे. पत्रकार संरक्षण कायदा असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ले पुन्हा वाढले आहेत. मुख्यमंत्र्यांनी पाचोर्याचे आमदार किशोर पाटील यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि राज्यपालांनी त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
या निवेदनावर मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे, सरचिटणीस संदीप शुक्ला, प्रदेश प्रतिनिधी नितीन शिरसाट व रणजीतसिंह राजपूत, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुभाष लहाने, पत्रकार संरक्षण समितीचे पुरुषोत्तम बोर्डे, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाची पदाधिकारी वसीम शेख, कासिम शेख, सिटी न्यूज चॅनलचे जितेंद्र कायस्थ, संजय जाधव, युवराज वाघ, अजय राजगुरे, अक्षय वरपे आदींच्या स्वाक्षरी आहेत.