ऐकावं ते नवलच..! नागपुरात दोन तरुणींचा साक्षगंध; त्यांना तरुणामध्ये नाही इंटरेस्ट...

 
file photo
नागपूर : प्रेम हे प्रेमच असतं... त्याला वयाचं, रंगाचं अन्‌ लिंगाचंही (आता तसंच म्‍हणावे लागेल!)  बंधन नसतं. भारतात समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता मिळाली असली तरी सामाजिक स्वीकारार्हता अजून पुरेशी वाढली नाही. पण नागपुरात एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या दोन तरुणींनी लग्नाचा निर्णय घेतला असून, दोघींचा साक्षगंध नुकताच पार पडला. या सोहळ्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
लेस्बियन, गे, बायो, ट्रान्सजेंडर समूहाच्या मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. साक्षगंध झालेल्या दोन्ही तरुणी उच्चशिक्षित आहेत. नामांकित संस्थेत दोघी मोठ्या पदावर आहेत. एक वर्षापूर्वी दोघींची भेट झाली होती. वर्षभर सोबत घालविल्यानंतर आपण "एक दुजे के लिए' आहोत असे दोघींना वाटू लागले. दोघींमध्ये प्रचंड प्रेम निर्माण झाले. दोघींनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे घरच्यांनी सुद्धा हे नाते मनमोकळेपणाने स्वीकारले. दोघी लेस्बियन असल्याने घरच्यांना कळल्यावर आधी धक्का बसला होता. मात्र दोघींचे कुटूंब उच्चशिक्षित असल्याने त्यांनी मुलींना समजून घेतले आणि त्यांच्या नात्यांचा स्वीकार केला. दोन तरुणीपैकी एक नागपुरातील तर दुसरी परराज्यातील आहे.