फोन पेवरून आधी प्रियकराला पैसे पाठवले अन् नंतर केले पलायन!
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, वराळे (ता. मावळ) येथील इंद्रायणी स्कूलमध्ये ९ व्या वर्गात सिद्धी (नाव बदलले आहे) शिकते. ५ जानेवारी रोजी सकाळी शाळेत जाते म्हणून ती घरातून बाहेर पडली. रोज ती दुपारी दीडला घरी येत होती. त्या दिवशी ती आलीच नाही. आईला वाटले की ट्युशनला गेली असेल. मात्र संध्याकाळपर्यंत ती आलीच नाही.
दरम्यान सिद्धी आज शाळेत व ट्युशनला देखील आली नसल्याचे सिद्धीच्या मैत्रीणीने तिच्या आईला सांगितले. त्यानंतर तिचा शोध घेऊनही ती सापडली नाही. त्यानंतर सिद्धीच्या आईने मोबाइल चेक केला असता त्यावरून फोन पेवरून एकाला ३ हजार रुपये पाठविल्याचे समोर आले. ज्या नंबर वर पैसे पाठवले त्यावर फोन करून चौकशी केली असता तुमच्या मुलीने नागेश गायकवाड याला देण्यासाठी पैसे पाठविल्याचे सांगितले. त्यामुळे तिच्या आईला नागेशवर संशय आला.
कारण याआधी देखील नागेशने सिद्धीला फूस लावून पळवून नेले होते. तळेगाव एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सिद्धीला शोधून आणून आई- वडिलांच्या ताब्यात दिले होते. त्यामुळे नागेशनेच माझ्या मुलीला फुस लावून पळवून नेले, अशी तक्रार सिद्धीच्या आईने दिली. तक्रारीवरून पोलिसांनी नागेशविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला.