पतीच्या चारित्र्याची परीक्षा...१४ वर्षीय मुलीवर डोळ्यांदेखत करायला लावला बलात्कार!; विकृत पती-पत्‍नीला अटक

 
वर्धा : पत्नीनेच पतीला एका १४ वर्षीय मुलीवर डोळ्यांदेखत बलात्कार करायला लावल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एका गावात समोर आली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नवरा -बायकोला अटक केली आहे. मारुती बारबदे आणि प्रिया मारुती बारबदे अशी अटक केलेल्या विकृत पती-पत्‍नीची नावे आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियाचा तिच्या पतीच्या चारित्र्यावर संशय होता. पतीची परीक्षा घेण्यासाठी तिने गावातीलच एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरी बोलावले. तू माझ्या नवऱ्यासोबत लग्न कर, असे म्हणून प्रिया घराचा दरवाजा बंद करून बाहेर निघून गेली. अल्पवयीन मुलगी आयतीच तावडीत सापडल्याने मारुतीने तिच्यावर बलात्कार केला.

थोड्या वेळानंतर त्याची पत्नी घरी आली असता तिला घरात काय झाले ते कळले. तिने पुन्हा पीडित मुलीला नग्न व्हायला लावले व नवऱ्याला तिच्या डोळ्यांदेखत मुलीवर बलात्कार करायला लावला. घटनेनंतर पीडित मुलीने तिच्या घरच्यांना घटनेबद्दल सांगितले. त्यानंतर पीडितेने आर्वी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अत्याचार करणाऱ्या पती-पत्नीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.