लाज कशी वाटत नाही! इकडे २५ जिवांचा कोळसा झाला अन् तिकडे बस मालकाला नुकसानभरपाईच पडलंय! विम्याचा लाभ मिळावा म्हणून अपघात झाल्यावर त्याच दिवशी काढली बसची बोगस पियुसी!
आरटओंनी केला पियुसी सेंटरचा परवाना रद्द
ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ट्रॅव्हल कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय अधिकाऱ्यांनी, नेत्यांनी गुंतवणूक केली आहे. आरटीओ व पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या ट्रॅव्हल्स कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामुळे कायद्याचा धाक या कंपन्यांना नाही. स्वतः व्यवसायात असल्याने बसेस वर कारवाई होत नाही. २५ बळी घेणारी ही विदर्भ ट्रॅव्हल्स पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीच्या नावाने आहे.
या ट्रॅव्हल्सची बहुतांश कागदपत्रे अद्यावत असली तरी पीयूसी ची मुदत संपलेली होती. ती नसल्याने आरोप होऊ नये व विम्याचा लाभ मिळताना अडचण होऊ नये या भीतीने चक्क जळालेल्या सांगाडा झालेल्या बसची ऑनलाईन पियूसी काढण्यात आली.
यवतमाळ आरटीओ कार्यालयाच्या समोर असलेल्या एका पियूसी सेंटर मधून पियूसी देण्यात आली.हे प्रमाणपत्र देणाऱ्यावर आरटीओ नी कारवाई केली असून त्याचा परवाना कायमचा रद्द केला आहे. दरम्यान ट्रॅव्हल्स मालकाने हे आरोप फेटाळले आहेत. व्यवसायिक स्पर्धेतून कुणीतरी खोडसाळपणा करून परस्पर पियुसी काढल्याचे म्हटले आहे.