हृदयद्रावक ! हातातून निसटल अन् पुरात वाहून गेलं ४ महिन्यांचं बाळ; आईचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

 
कल्याण( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): राज्यात कालपासून ठिकठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. काही जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून २२ जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यंदा पावसाने जून आली जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात लोकांना तरसायला लावले. त्यामुळे कालपासून सुरू असलेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे. मात्र या आनंदात विरजण पडणाऱ्या काही घटना घडल्या आहेत.
बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील मामुलवाडी येथे भिंत कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय तर शेतकऱ्याचा मुलगा गंभीर जखमी झालाय. सकाळी म्हशीचे दूध काढत असताना रात्रीच्या पावसाने भिजलेली जुनी भिंत पिता पुत्राच्या अंगावर कोसळली होती. तिकडे कल्याण मध्ये एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. ४ महिन्यांचे बाळ हातातून निसटल्याने पुरात वाहून गेले, यावेळी बाळाच्या आईचा काळीज हेलावणारा आक्रोश पाहून अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.
    अंबरनाथ लोकल ठाकुर्ली आणि कल्याण यादरम्यान बंद पडली. सुमारे २ तास लोकल बंद पडल्याने काही प्रवाशी उतरून कल्याणच्या दिशेने जात होते. त्यातच एक छोटं बाळ घेऊन एक काका आणि त्या बाळाची आई जात होती. यावेळी एका अरुंद आणि पावसामुळे निसरड्या झालेल्या नाल्याच्या पुलावरून बाळ काकाच्या हातातून निसटल अन् नाल्यात पडलं. पावसामुळे आधीच नाल्याला पुर आल्यामुळे त्या पुरात काही क्षणांत बाळ वाहून गेलं.