शाळेत जाताना तिला तो भेटायचा, एक दिवस कालव्यालगत नेऊन....

 
बारामती ः पुणे जिल्ह्यातील बारामती येथे अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेत जाताना तिला अडवून २५ वर्षीय तरुणाने कालव्यालगत नेत तिच्यावर तीनदा लैंगिक अत्‍याचार केला. यातून ती गर्भवती झाली. पोलिसांनी केवळ टॅट्यूवरून तपास करत संशयिताच्या मुसक्‍या आवळण्यात यश मिळवले.

पीडित मुलगी अवघ्या १५ वर्षांची आहे. मोरगाव रस्त्याने शाळेत जात असताना सलीम उर्फ सागर इक्बाल मुश्रीफ (वय २५, रा. गोजूबावी, ता. बारामती, मूळ रा. लक्ष्मीनारायणनगर, कसबा, बारामती) याने तिच्याशी ओळख केली. दोन-तीनदा भेटल्यानंतर सलीमने तिला फूस लावून कालव्यालगत नेले. तिथे तिच्यावर तीनदा लैंगिक अत्‍याचार केला. मासिक पाळी चुकल्याने तिच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला.

तिच्या आईने बदनामीच्या भीतीने पोलिसांत न जाता तिला पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे कर्तव्यावर असलेल्या एका कर्मचाऱ्याने पोलिसांना अल्पवयीन मुलगी गरोदर असून, तिला उपचारासाठी आणल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने रुग्‍णालयात जाऊन तिच्या आईची चौकशी केली. त्‍यानंतर मुलीवर वारंवार लैंगिक अत्‍याचार झाल्याचे समोर आले. पोलिसांनी तपास सुरू केला. पण मुलीला हातावर गोंदवलेल्या सागर या नावापलिकडे काही त्‍याची ओळख सांगता आली नाही. मात्र तेवढ्यावरूनच पोलिसांनी तपासाला गती देत सलीम उर्फ सागरला अटक केली. पोलिसी खाक्‍या दाखवताच त्‍याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. वाघमोडे, तुषार चव्हाण, मनोज पवार, दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, बंडू कोठे यांनी संशयिताला अटक करण्याची कामगिरी केली.