वेश्येला घरात घेऊन आधार दिला...पण नंतर तिच्यावरच कोसळले हे आभाळ!

 
मुंबई : एका आईचा निर्दयी चेहरा समोर आला आहे. चार महिन्यांच्या चिमुकलीला घरमालकिनीकडे सोडून वेश्या पसार झाली आहे. त्यानंतर महिनाभराच्या अंतरात या वेश्येकडे नेहमी येणारा तिचा मित्र या चिमुकलीला घेऊन पळून गेला. त्‍यामुळे तिला आश्रय देणारी महिला चक्रावली असून, तिने पोलिसांत या घटनेची माहिती दिल्याने वेश्येच्या मित्राविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्वरी अब्दुल रशीद शेख (५०, रा. पांडू महाराज चाळ, गिरगाव, मुंबई) या महिलेने पोलिसांना सांगितले, की ती सफाईकाम करते व भाड्याच्या खोलीत एकटीच राहते. २ महिन्यांपूर्वी एक ३० वर्षे वयाची महिला तिच्याकडे आली. घरात राहायला जागा द्या. मी भाडे व मुलीला सांभाळण्याचे अधिकचे पैसे देईल, असे म्हणाली. त्यामुळे अन्वरी यांनी त्या महिलेला घरात आसरा दिला. ती महिला वेश्याव्यसाय करायची, असे तक्रारीत म्हटले आहे.

ती जेव्हा बाहेर जायची तेव्हा अन्वरी या मुस्कान या तिच्या मुलीला सांभाळायच्या. या दरम्यान मुस्कानच्या आईचा मित्र असलेला इब्राहिम हा सुद्धा अधूनमधून खोलीवर यायचा. १ डिसेंबर रोजी मुस्कानची आई कामानिमित्त जाते म्हणून निघून गेली मात्र ती परत आलीच नाही. तिचा शोध घेऊनही ती सापडली नाही. इब्राहीमकडे याबाबत चौकशी केली असता त्याने माहीत नसल्याचे सांगितले. त्यामुळे अन्वरी याच ४ महिन्यांच्या मुस्कानचा सांभाळ करू लागल्या.

अधूनमधून इब्राहीमसुद्धा मुस्कानला पहायला यायचा. अन्वरी या सफाईकामासाठी बाहेर जात असताना मुस्कानला इब्राहीमकडे सोडून जात होत्या. २७ डिसेंबर रोजी मुस्कानला पोलिओ डोस द्यायचा, असे सांगून इब्राहीम मुस्कानला घेऊन गेला. मात्र बराच वेळ होऊनही तो परतला नाही. त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो न आल्याने अन्वरी शेख यांनी मुंबईच्या विधान परिषद मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी इब्राहीमविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला.