विवाहबाह्य संबंध ठेवणे म्हणजे पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाचे मत

 
नागपूर : पतीने विवाहबाह्य संबंध ठेवणे म्हणजे पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणे असा अर्थ होऊ शकत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले आहे. या प्रकरणात पती व त्याच्या कुटूंबियाविरुद्धचा वादग्रस्त एफआयआरसुद्धा न्यायालयाने रद्द केला. न्यायमूर्ती महेश सोनक आणि पुष्पा गणेडीवाला यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

याप्रकरणात विवाहबाह्य संबंधामुळे पतीने पत्नीचा छळ केल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. पत्नीचा असह्य मानसिक छळ केल्याचा किंवा आत्महत्येस भाग पाडणारी कोणतीही कृती केल्याचा आरोप नाही. विवाहबाह्य संबंध ही एकमेव बाब आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल होण्यासाठी पुरेशी नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. वाशिम जिल्ह्यातील हे प्रकरण असून जानेवारी २०१९ मध्ये पोलिसांनी विवाहितेच्या पतीसह सासरच्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

विवाहिता मानसिक आजारी होती. २०१६ पासून तिच्यावर उपचार सुरू होते.जानेवारी २०१९ मध्ये तिने आत्महत्या केली होती. त्यानंतर विवाहितेच्या आईने जावई व त्याच्या कुटूंबियाविरुद्ध तक्रार दिली होती. मात्र त्यानंतर तक्रारदार सासू आणि जावयात तडजोड झाल्याने गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाने हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेतला. पिनाकीन रावल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने असाच निर्णय देत पतीचे विवाहबाह्य  संबंध म्हणजे पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणे होऊ शकत नाही, असे म्हटले होते.