STATE NEWS पांडुरंगाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी! जून महिन्यापासून पंढरपुरात...

 
पंढरपूर (लाइव्ह ग्रुप नेटवर्क): पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धन आणि सुशोभीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या सुरू असलेल्या कामामुळे भाविकांना पांडुरंगाच्या चरणांचे दर्शन घेता येत नव्हते, त्यामुळे भाविक केवळ मुखदर्शन घेत होते. मात्र आता जून महिन्यापासून पंढरपुरात पांडुरंगाचे पदस्पर्श दर्शन सुरू होण्याची शक्यता आहे. 
  मे महिन्याच्या अखेरपर्यंत काम पूर्ण होईल आणि जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरू होणार असल्याची माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला मूळ रूप देण्यासाठी राज्य सरकारने ७४ कोटी रुपयांचा मंदिर विकास आराखडा मंजूर केलेला आहे. १५ मार्चपासून हे काम सुरु असल्याने भाविकांना पदस्पर्श दर्शन बंद आहे. सकाळी ६ ते सकाळी ११ या वेळेत भाविकांना मुखदर्शन घेण्याची सोय मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान हे काम या महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होऊन जून पासून पांडुरंगाचे चरण स्पर्श दर्शन घेता येणार आहे.