दीड वर्षे तिच्यावर वारंवार होत होता लैंगिक अत्‍याचार; त्‍या दिवशी पती-मुलाने पाहिल्याने फुटले बिंग!

 
rape
पुणे ः राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या मुलाने भाजीपाला विक्रेत्या महिलेवर वारंवार बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात ही घटना घडली असून, पीडित ३२ वर्षीय विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी समीर बंडुतात्या गायकवाड (रा. मुंढवा, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा  दाखल केला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ३२ वर्षीय महिलेचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. समीर अनेकदा भाजी आणण्यासाठी महिलेच्या घरी जायचा. दीड वर्षापूर्वी महिला घरात एकटी किचनमध्ये काम करत असताना त्‍याने तिला मागून पकडले. तिने विरोध केल्यावर त्याने संपूर्ण खानदान संपवून टाकेन, अशी धमकी दिली व जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला. पीडितेने बदनामीच्या भीतीपोटी कुणालाही ही बाब सांगितली नाही.

त्यानंतर तब्बल दीड वर्ष संधी मिळताच तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करत राहिला. १७ डिसेंबर रोजी पीडित महिला घरी एकटी असताना समीर पुन्हा तिच्या घरात शिरला. त्याने शारीरिक संबंधाची मागणी केली. जबरदस्ती संबंध ठेवत असताना महिलेच्या पतीने आणि मुलाने हा प्रकार बघितला. त्यानंतर पतीला आणि मुलाला मारण्याची धमकी देऊन समीर निघून गेला. या प्रकरणानंतर मुंढवा पोलीस ठाण्यात पीडित महिलेने तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी समीर गायकवाडविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.