आधी प्रियकराने घेतला गळफास... तीन दिवसांनी अल्पवयीन प्रेयसीने बघा काय केलं...

 
मुंबई : मुंबईतील चेंबूर भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने वाशी येथील खाडी पुलावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने स्थानिक मच्छिमारांनी आणि पोलिसांनी तिला बाहेर काढल्याने तिचा जीव वाचलाय. मात्र नाकातोंडात पाणी गेल्याने तिला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात भरती करण्यात आले. तिने आत्महत्येचा प्रयत्न का केला हे कळल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला.

चेंबूर भागात राहणाऱ्या या मुलीचे त्याच भागात राहणाऱ्या एका तरुणावर प्रेम होते. दोघांचेही प्रेम चांगलेच बहरले होते. एकमेकांशिवाय राहायचे नाही, असा निर्धार करत लग्न करण्याच्या आणाभाका सुद्धा दोघांनी घेतल्या होत्या. दरम्यान तरुणाने तिच्याकडे लग्नाची मागणी केली.

मात्र सध्या अल्पवयीन असल्याने तिने लग्नाला नकार दिला. १८ वर्षे पूर्ण झाल्यावर लग्न करू, असे तिने प्रियकराला सांगितले. मात्र त्यानंतर प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे तिला नैराश्य आले होते. प्रियकर गेल्यावर आता आपण तरी कशाला जगायचे, असा विचार तिच्या मनात आल्याने ती वाशी येथील खाडी पुलावर गेली आणि तिने पुलावरून पाण्यात उडी घेतली. मात्र वेळीच स्थानिक मच्छिमारांनी तिला बाहेर काढून तिचा जीव  वाचविल्याने मोठा अनर्थ टळला.