बाप रेऽऽ बेरोजगारीचं भूत पुन्हा मानगुटीवर!; डिसेंबरमधील आकडेवारी चिंताजनक!!
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (सीएमआयई) ही बेरोजगारीची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीमुळे अर्थव्यवस्थेवरील जोखीम वाढली असल्याचे सुद्धा सीएमआयईने म्हटले आहे.मार्च २०२२ पर्यंत बेरोजगारी दर ९.५५ टक्क्यापर्यंत वाढण्याची भीती सुद्धा या संस्थेने व्यक्त केली आहे. मागील आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येत देशभरात प्रचंड वाढ झाली. त्यामुळे अनेक राज्यांनी स्थानिक पातळीवर पुन्हा निर्बंध लागू केले आहेत.
इतर राज्यांमध्ये सुद्धा येणाऱ्या काळात निर्बंध लागू होऊ शकतात. त्यामुळे असंघटित क्षेत्रातील नोकऱ्यांवर संकट येण्याची शक्यता आहे. सोमवारी देशभरात ३३ हजार ७५० कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे यंत्रणा अलर्ट झाली आहे. दिल्लीत सिनेमागृह आणि व्यायाम शाळा बंद करण्यात आले आहेत तर महाराष्ट्रात सुद्धा पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत देशभर तीन महिने कठोर निर्बंध होते. मे २०२० मध्ये बेरोजगारी दर हा १२ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. यात तरुणाई आणि तात्पुरत्या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्यांना नोकरी गमवावी लागली होती. तेच दिवस पुन्हा एकदा येण्याची शक्यता आहे.